- येत्या सोमवारी ठरणार पक्षाचा नवा शहराध्यक्ष….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ एप्रिल २०२५) :- भाजप पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष पदाचा निर्णय येत्या ५ तारखेपर्यंत होणार आहे. त्यासाठी सध्या प्रमुख इच्छुकांमध्ये चुरस लागली आहे. मोरवाडी येथील पक्षकार्यालयात त्यासाठी सोमवारी (दि. २८) २६ पदाधिकाऱ्यांनी गुप्त मतदान केले.
भाजप शहर अध्यक्ष पदासाठी पर्यवेक्षक तथा आमदार सिद्धार्थ शिरोळे, प्रदेश चिटणीस तथा निवडणूक अधिकारी वर्षा डहाळे यांच्या उपस्थितीत गुप्त मतदान झाले. याबाबतचा बंद लिफाफ्यातील अहवाल प्रदेश भाजपकडे सादर केल्यानंतर शहराध्यक्ष पदाचे नाव जाहीर होणार आहे. मात्र, त्यासाठी पाच ते सहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. येत्या ५ तारखेपर्यंत याबाबत निर्णयजाहीर होईल, असे राजकीय वर्तुळातून सांगितले जात आहे.
भाजप शहराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये जुन्या व नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झालेली आहे. शहराध्यक्ष पदासाठी प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष तथा पक्ष प्रवक्ते राजू दुर्गे, शहर कार्यकारी अध्यक्ष शत्रुघ्न काटे, संजय मंगोडेकर, विजय फुगे, संतोष कलाटे, शैला मोळक, सुजाता पालांडे आदी प्रमुख इच्छुक आहेत.
प्रदेश भाजपने शहरातील प्रमुख २६ पदाधिकाऱ्यांची नावे मतदानासाठी जाहीर केली होती. त्यामध्ये शहर भाजप कोअर समितीमधील सदस्य, महापालिकेचे माजी पदाधिकारी, सहसंयोजक, शहर सरचिटणीस, महिला आघाडी शहराध्यक्ष, भाजप युवा मोर्चा शहराध्यक्ष, अनुसूचित जाती व जमाती मोर्चा आणि विविध मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश होता. मतदान प्रक्रियेवेळी भाजप शहराध्यक्ष तथा आमदार शंकर जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार अमित गोरखे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, नामदेव ढाके, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे आदी उपस्थित होते. आमदार उमा खापरे बाहेरगावी असल्याने त्यांनी बंद लिफाफ्यामध्ये मतदान पाठविले होते.
भाजप शहराध्यक्षपदासाठी खासदार, आमदार यांना संधी द्यायची नाही, असा निर्णय झालेला आहे. त्यामुळे मी पुन्हा शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत नाही. शहराध्यक्ष पदासाठी गुप्त मतदान झाल्यानंतर आता येत्या ५ तारखेपर्यंत शहराध्यक्षपद निवडीचा निर्णय होणार आहे.
– शंकर जगताप, आमदार तथा भाजप शहराध्यक्ष.











