न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२५) :- पिंपरी-चिचवडचा नवीन विकास आराखडा प्रशासकीय राजवटीत येत्या पंधरा दिवसांत प्रसिद्ध होणार आहे. कुदळवाडी परिसराचाही यात समावेश होणार आहे. त्यात महापालिका, प्राधिकरण, देवस्थान आणि खासगी क्षेत्राचा एकत्रित समावेश असेल. तो जाहीर होण्यापूर्वीच टीडीआर, एफएसआय मिळवून देण्यासाठी एजंटगिरी सुरू झाली आहे.
२०१८ पासून नव्या आराखड्याचे काम सुरू होते. त्यास मुदतवाढ दिली होती. ही मुदत १७ मे २०२५ ला संपणार आहे. त्यापूर्वीच आराखडा जाहीर करण्याची लगबग सुरू आहे. कुदळवाडीतील रस्ते, उद्याने, शाळा, क्रीडांगणे अशा आरक्षणांचा आणि नवीन जागांचा विकास करण्यासाठी महापालिकेच्या नगररचना विभागाच्या वतीने अ आणि ब पत्रक भरून घेण्यात सुरुवात झाली आहे.
कुदळवाडी परिसरात अतिक्रमणांचा मुद्दा पुढे करून महापालिकेने ८४६ एकरांवरील ४१११ बांधकामांवर बुलडोझर फिरवला. त्यात पालिकेची ३ कोटी ६० लाख ५६ हजार ७४६ चौरस फुटाची जागा मोकळी झाली. १९९७ मध्ये चिखली-जाधववाडीत पालिकेत आला. त्यानंतर आरक्षणाची अंमलबाजवणी झाली नव्हती. आता कारवाईत रस्ते, शाळा, उद्याने यांची एकूण १८ आरक्षणे मोकळी झाली. मोकळ्या केलेल्या एकूण जागेपैकी १०० एकरवर आरक्षणे टाकण्यात येणार आहेत.
















