न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ मे २०२५) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षेतील मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसऱ्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. साधारण ६ ते ७ मे दरम्यान बारावीचा आणि १० ते १३ मे दरम्यान दहावीचा निकाल जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा दहावी बारावीच्या परीक्षा दरवर्षपेक्षा दहा ते पंधरा दिवस अगोदर घेण्यात आल्या. परीक्षा सुरू असतानाच पेपर तपासणीचे काम सुरू करण्यात आले. तसेच क्रीडा गुणांची नोंद करण्यासाठी २१ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यामुळे क्रीडा गुणांसह सवलतीचे गुण राज्य मंडळाकडे प्राप्त झाले आहेत. गेल्या वर्षापासून दहावी-बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षांचे गुण ऑनलाइन घेण्यात येत आहेत.
राज्य मंडळाने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी कळवावेत, असे शाळा-महाविद्यालयांना आवाहन केले होते. त्यानुसार दहावी-बारावीला बसलेल्या तब्बल ३१ लाख विद्याध्यपैिकी २१ लाख विद्याध्यर्थ्यांचे अपार आयडी राज्य मंडळाला प्राप्त झाले आहेत. विद्यार्थ्यांना निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांच्या डिजीलॉकर अॅपमध्ये निकाल उपलब्ध करून दिला जाणार आहे. अन्य विद्यार्थ्यांना राज्य मंडळाने उपलब्ध करून दिलेल्या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार आहे. अपार आयडी असलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल कायमस्वरूपी त्यांना डिजीलॉकर अॅपमध्ये उपलब्ध होणार असल्याने संबंधित विद्यार्थ्यांना त्याचा भविष्यात कोठेही उपयोग करता येणार आहे.















