न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२५) :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून येत्या जुलै-ऑगस्ट महिन्यात घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात दहा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पुरवणी परीक्षेसह शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये दहावी बारावीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या खिशाला कात्री लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. परीक्षांसाठीचे सुधारित शुल्क राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी- बारावीच्या परीक्षा शुल्कात १० टक्क्यांची वाढ करण्याचा निर्णय २४ एप्रिल रोजी घेतला आहे. आता विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कापोटी ४७० रुपयाऐवजी ५२० रुपये भरावे लागणार आहेत. याव्यतिरिक्त १७ नंबर अर्ज भरून परीक्षेला बसणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना एक हजार ११० रुपये नोंदणी शुल्क भरावे लागेल. शासनाने तीन वर्षांत ३० टक्के परीक्षा शुल्कवाढीचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे दरवर्षी १० टक्के वाढ करण्याचे ठरवण्यात आले.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा शुल्कात सलग तिसऱ्यांदा वाढ केली आहे. २०२५-२६. या शैक्षणिक वर्षासाठी दहावीच्या नियमित विद्यार्थ्यांकडून आता ५२० रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे. याआधी ४७० रुपये शुल्क आकारले जात होते. आता यामध्ये ५० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय कार्यकारी परिषदेच्या नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत झाला.
राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यकारी परिषदेच्या बैठकीत परीक्षा शुल्कवाढीचा मुद्दा चर्चेला आला होता. या चर्चेनंतर निर्णय घेत फक्त परीक्षा शुल्कात वाढ झाली. इतर शुल्कांमध्ये जसे प्रशासकीय शुल्क, गुणपत्रक शुल्क व प्रमाणपत्र शुल्कात कोणताही बदल केला नाही. यामध्ये प्रत्येक प्रकारासाठी २० रुपये शुल्क कायम आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेनंतर मिळणाऱ्या गुणपत्रिका व प्रमाणपत्रे लॅमिनेट स्वरूपात दिली जातात. यासाठी प्रत्येकी २० रुपये शुल्क आकारले जात आहे, हे शुल्क देखील विद्यार्थ्यांकडूनच घेतले असल्याचे दिसून येत आहे.