- नदी सुधार प्रकल्पाच्या कामावर ओढले ताशेरे…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ मे २०२५) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून वाकड, पिंपळे निलख परिसरातील मुळा नदीपात्रात भराव टाकून ती अरुंद केली जात आहे. याबाबत राष्ट्रीय हरित लवादापाठोपाठ महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाने न जुमानणाऱ्या महापालिकेचे कान टोचले आहेत. ‘नदीतील मूळ प्रवाह कायम ठेवून भराव काढून टाकावा,’ असे आदेश दिले आहेत. यावर आता आयुक्त काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सीमेवरून मुळा नदी वाहते. या नदीचे सुशोभीकरणाचे काम पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेले आहे. उद्योगनगरीच्या बाजूने वाकड ते पिंपळे निलख या भागामध्ये सध्या काम सुरू आहे. या कामासाठी ठेकेदाराने वृक्षतोड केली आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर भराव टाकून नदी अरुंद केली आहे. त्यात वाकड, बालेवाडी पुलापासून तर कस्पटेवस्ती, विशालनगर, बालेवाडी,
पिंपळे निलख, दादा घाट या परिसरात सध्या जोरात काम सुरू आहे आणि त्यासाठी छोटी मोठी झाडे ठेकेदाराने कोणतीही परवानगी न घेता तोडली आहेत. त्याचबरोबर मुळा नदी किनाऱ्यापासून पन्नास मीटर आत पाणी असणाऱ्या भागांमध्ये राडारोडा टाकला होता.
थेट महापालिकेला महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम नुसार पत्र पाठवून खडसावले आहे. कार्यकारी अभियंता रा. बा. गव्हाणकर यांनी पत्र दिले आहे. त्यात मुळा नदीपात्रात पिंपळे निलख स्मशानभूमीजवळ भराव करून राडारोडा टाकल्याचे व नदीच्या क्षेत्रामधील जागेत अतिक्रमण केल्याचे निदर्शनास आलेले आहे. भराव करून मुळा नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण केलेला आहे. ही बाब ही अत्यंत गंभीर असून, त्यामुळे आम्ही आपणास पत्र पाठवित आहोत. आपण केलेले अतिक्रमण व नदीमध्ये केलेला भराव ताबडतोब स्वखर्चान काढून टाकावा व नदीची जागा पूर्वस्थितीत करून द्यावी, अन्यथा आपणावर शासन निर्णय, महाराष्ट्र सिंचन कायदा १९७६ नुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असं म्हटले आहे.