- कार्यकर्त्यांच्या प्रयत्नाने रस्त्यावर वाहून जाणाऱ्या “कॅबिन”ला अडवण्यात यश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ मे २०२५) :- गेल्या दोन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात संध्याकाळच्या वेळेस मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत केलेली कामे त्याचप्रमाणे पालिकेने केलेल्या विकास कामांची “सत्यता” मात्र रस्त्यावर वाहत असताना दिसत आहे.पालिकेच्या अनागोंदी कामाचा फटका उद्यानातील सुरक्षा रक्षकाच्या कॅबिनला बसला. कार्यकर्त्यांच्या सजगतेमुळे कॅबिन रस्त्यावर वाहून आली नाही.उद्यानाच्या भिंतीजवळ तिला अडवण्यात आले.
प्राधिकरणातील सेक्टर २६ मधील नाट्यगृहाजवळील “अँडव्हेंचर पार्क” मधील नाला साफ सफाई न झाल्यामुळे कालच्या मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पाण्याला बंधाऱ्याचे स्वरूप आले.सदरचे पाणी त्यामुळे उद्यानामध्ये जाऊ लागले. उद्यानातील कॅबिन सदरच्या वाढत्या पाण्यामुळे तरंगू लागली. काही वेळातच ओढ्यातील पाण्याचा प्रवाह वाढल्याने कॅबिनही वाहू लागली. प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे विभागीय अध्यक्ष व पदाधिकारी संतोष चव्हाण, विशाल शेवाळे ,किरण चौधरी ह्यांच्या सजगतेमुळे सदरच्या कॅबिन ला उद्यानाच्या संरक्षक भिंतीच्या आत मध्ये अडविण्यात यश आले. रस्त्यावर पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कॅबिन रस्त्यावर येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असता.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष डॉ.विजयकुमार पाटील म्हणाले,” अ प्रभाग विभागाअंतर्गत १७ पेक्षा जास्त नाले असून निम्म्यापेक्षा जास्त नाले अजूनही साफ केले गेलेले नाहीत.सदरच्या नाल्यामध्ये पाणी जाण्यासाठी टाकण्यात आलेले पाईप छोट्या व्यासाचे असल्याने सदरचे पाईप्स गाळाने व कचऱ्याने भरून जातात त्यामुळे नाला तुंबतो व सर्व पाणी अँडव्हेंचर पार्क मध्ये घुसते. शहरातील १५० पेक्षा जास्त नाले व्यवस्थित साफ न केल्यामुळे अनेक ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरते व नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. कोट्यवधी रुपये नाले सफाईला दरवर्षी खर्च केले जातात मात्र कामाची गुणवत्ता अतिशय सुमार असते. आयुक्त शेखरसिंग यांनी या “कॅबिन” प्रकरणामुळे तरी नालेसफाई कडे गांभीर्याने पहावे.”
















