- गृहप्रकल्पातील ६० टक्क्यांहून अधिक सदनिका भाडेतत्त्वावर?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. २८ मे २०२५) :- पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाने उभारलेल्या गृहप्रकल्पात ६० टक्क्यांहून अधिक सदनिका भाडेतत्त्वावर देण्यात आल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने सोसायटीतील किती सदनिकांमध्ये भाडेकरू राहत आहेत, याबाबतची माहिती तुम्हीच कळवावी, असे पत्रक पीएमआरडीएकडून गृहप्रकल्पातील प्रत्येक सोसायटीधारकांना काढण्यात आले आहे.
प्राधिकरणाने उभारलेल्या गृहप्रकल्पातील सदनिका या लॉटरीच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत या घरांचे वाटप करण्यात आले. दरम्यान, या पैकी अनेक सदनिकांचे वाटप केल्यानंतर सर्रासपणे त्या भाड्याने दिल्या असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकल्पातील जवळपास ६० टक्क्यांहून अधिक सदनिका या भाडेतत्वावर देण्यात आल्या आहेत. या बाबत वेगवेगळ्या सहकारी संस्थेचे अध्यक्ष व अन्य पदाधिकारी यांनी तक्रार केली होती. तसेच, पीएमआरडीए कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. दरम्यान, त्याची दखल घेत पीएमआरडीएच्या अभियांत्रिकी आणि जमीन व मालमत्ता विभागाने बैठक घेतली. त्यानुसार, भाड्याने दिलेल्या सदनिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.
याप्रकरणी सदनिकाधारकांना त्यांच्या सोसायटीमध्ये राहणाऱ्या भाडेकरूंची माहिती मागवण्यात आली आहे. पेठ क्रमांक १२ येथील फेज १, फेज २ याअंतर्गत सदनिकाधारकांनी सदनिका भाड्यांनी दिलेल्या आहेत. त्याची यादी तत्काळ अभियांत्रिकी विभागास कळवावी, असे पत्र सोसायाटीधारकांना पाठवले आहे. त्या अनुषंगाने संबंधित सदनिकाधारकांना नोटीस काढण्यात येणार आहे.
पीएमआरडीए अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका घेतली असल्यास, करारनुसार ते घर दहा वर्षांपर्यंत विकता अथवा हस्तांतर करण्यात येत नाही. तसेच, प्राधिकरणाच्या नियमानुसार ते भाड्याने देता येत नाही; मात्र गृहप्रकल्पात ६० टक्क्यांपेक्षा अधिक सदनिका या भाडे तत्त्वावर दिल्या असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे जमीन व मालमत्ता विभागाने यापूर्वी नोटीस काढली होती. मात्र, तरीही संबंधित सदनिकाधारकांनी त्याची दखल घेतली नसल्याने अखेर अशा सदनिकांधारकांचे आर्टिकल ऑफ अॅग्रीमेंट रद्द करण्यात येईल, असे पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
















