- हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केलेले आरोप काढले खोडून..
- वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे पत्रकार परिषदेत भावूक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२५) :- वैष्णवी हगवणेला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या, छळ करणाऱ्या हगवणे परिवाराच्या बचावासाठी कोर्टात त्यांच्या वकिलांनी वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे देखील उडवले. वैष्णवी नको त्या व्यक्तीसोबत चॅट करायची तिचे चॅट पकडले असा संतापजनक दावा हगवणेच्या वकिलांनी केला आहे. हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये युक्तिवाद करताना वैष्णवीच्या चारित्र्यावरच बोट ठेवलं. वैष्णवीची प्रवृत्तीच आत्महत्या करण्याची होती, असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलांनी केला आहे. त्या आरोपांवरती आज वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं आहे.
अनिल कस्पटे बोलताना म्हणाले, काल आरोपींचे वकील बोलले ते सर्वांनी ऐकले आहे. समाजाने ऐकले आहे. ते चुकीचे बोलले आहेत. असे एखाद्या मुलीच्या चारित्र्यावर बोलले हे चुकीचे आहेत. ते म्हणतात त्यांच्याकडे कोटींच्या गाड्या आहेत, पण त्यांच्याकडे एकच फोर्ड गाडी आहे. मला लग्नात त्यांनी गाडी मागितली होती. माझ्या मुलीची दोन लग्न त्यांनी मोडली. लग्नावेळी वेगवेगळ्या मागण्या केल्या. मागण्या पुर्ण केल्या नाही तर लग्नासाठी उभं राहणार नाही असं सांगितलं होतं. त्यांनी गाडीची, चांदीची भांडी, गाडी, मागितली. त्यांनी आदीकमासात देखील माझ्याकडे चांदीची भांडी मागितली होती. ती देखील मी दिली. चर्चा वेगळी चालली ते वकील बोलले. त्यांनी केलेले कृत्य माझ्या मुलीचा बळी याला वेगळी कलाटणी द्यायचा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी माझ्या मुलीच्या अंगावर शिंतोडे उडवले आहेत.
शशांक हगवणेला दिलेल्या दीड लाखांच्या मोबाईलचे हफ्ते आजही मी भरत आहे. लग्नामध्ये फॉर्च्युनर देण्याअगोदर मी एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती. त्यांनी त्यामुळं वादावादी केली, मला फॉर्च्युनर नाही दिली तर मी एमजी हेक्टर पेटवून देईन असं सांगण्यात आलं, म्हणून फॉर्च्युनर दिली अशी माहिती देखील वैष्णवीच्या वडीलांनी अनिल कस्पटेंनी दिली आहे. निलेश चव्हाण देखील या कटात सहभागी होता, त्यावेळी तिथं तो ही होता, असा दावा देखील अनिल कस्पटेंनी केला आहे.
आमचा जालिंदर सुपेकर यांचा काही संबंध आला नाही. मामा म्हणून सुपेकर जालिंदर असं पत्रिकेत नाव आहे. त्याचा हगवणे कुटुंबाशी संबंध आहे. वैष्णवीने आत्महत्या करण्याआधी पाच ते सहा दिवस सातत्याने हगवणे कुटुंब तिला मारहाण करत होते. वैष्णवीवर आता काही आरोप करत आहेत, शिंतोडे उडवत आहेत, शेवटी बोलताना अनिल कस्पटे भावूक झाले, त्यांनी हात जोडून माझ्या मुलीवर शिंतोडे उडवू नका म्हणत हात जोडले. वैष्णवीच्या वडिलांना पत्रकार परिषदेमध्ये अश्रू अनावर झाले, तुम्हाला ही मुली असतील, तुम्ही सर्वांनी हा विचार करावा, अशी कळकळीची विनंती म्हणत अनिल कस्पटे यांनी हात जोडले.
आम्ही आधी एमजी हेक्टर बुक केली होती, ती नाकारुन फॉर्च्युनरची मागणी झाली. एमजी हेक्टर बुकिंगची रिसीट देखील यावेळी अनिल कस्पटे यांनी दाखवली आहे. शशांकने दीड लाखांचा मोबाईल घेतला, त्याची पावती देखील कस्पटेंनी दाखवली. आजही मी मोबाईलचे हफ्ते भरतोय, असंही कस्पटेंनी यावेळी सांगितलं आहे.