न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ मे २०२५) :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित तीन दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून विचार प्रबोधन पर्वाची सुरुवात करण्यात आली.
प्रबोधन पर्व उद्घाटन कार्यक्रमास माजी नगरसदस्य राजू दुर्गे,जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,सामाजिक कार्यकर्त्या विना सोनवलकर, बंडू मारकड, राजेंद्र गाडेकर, आशा काळे, धनंजय तानले, महावीर काळे, शारदा मुंडे, रेखा दुधभाते, दत्ता शेंडगे, नरेंद्र चऱ्हाटे, बिरू बनमाने, नवनाथ बिडे, निखील पडळकर, महादेव कवितके, अजय पाताडे, शोभा भराडे, राजश्री जायभाये, कविता पाटील, बापू गडदे, यशोधन नायकवडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महापालिका अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर म्हणाल्या की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी स्व:कर्तुत्वाने सर्वसामान्य नागरिकांना अपेक्षित असलेले लोककल्याणकारी राज्य अनेक वर्षे चालवले. त्यांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या. अहिल्यादेवींच्या लोककल्याणकारी राज्याचा आदर्श घेत शहरातील नागरिकांना आवश्यक सेवा सुविधा देण्यास पिंपरी चिंचवड महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
















