न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जून २०२५) :- एसटी महामंडळाने पाच हजार नव्या बसगाड्यांची खरेदी सुरू केली असून, बसेसची निर्मिती, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दापोडी, हिंगणा आणि चिखलठाणा येथील एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळा बंद होणार आहेत. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड शहरातील दापोडी कार्यशाळेमधील ३६३ कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश देण्यात आल्याने कामगार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
सुमारे ३८ एकरवर असलेल्या दापोडीतील कार्यशाळेत २०१६ पासून नव्या बसगाड्यांची बांधणी थांबली असून, सध्या केवळ जुन्या चॅसिसवरच काम सुरू आहे. आता महामंडळाने कार्यशाळेतील वर्ग-३ आणि वर्ग-४ कर्मचाऱ्यांच्या बदलीसाठी पसंतीक्रम मागविला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे.
कामगार संघटनांनी या बदली आदेशास तीव्र विरोध दर्शवला आहे. कार्यशाळा बंद करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल आहे. कार्यशाळेच्या अद्ययावतीकरणाकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे, असा आरोप करत जागांचे खासगीकरण होण्याची शक्यता कामगार संघटनांनी व्यक्त केली आहे.
दापोडी कार्यशाळेने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. येथे कुशल कारागीर असून, त्यांचा वापर बसेसच्या बांधणीसाठी करावा, असे आम्ही राज्य शासनास सांगितले असून लवकर कामगारांच्या बदल्या रद्द होतील, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे.
– संदीप शिंदे, केंद्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना…