- थेरगावातील दोन मित्र बुडाले…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२५) :- लोणावळा येथील प्रसिद्ध पर्यटनस्थळ असलेल्या भुशी धरणात रविवारी दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. वर्षा पर्यटनासाठी लोणावळ्यात आलेले हे पर्यटक भुशी धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात गेले व तिथे बुडाले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
मोहम्मद जमाल आणि साहिल शेख अशी धरणात बुडून मृत्यू पावलेल्या तरुणांची नावे आहेत. दोघेही उत्तर प्रदेशातील मिर्जापूर येथील रहिवासी असून सध्या थेरगाव, पुणे येथे कामाला होते. आठ मित्रांसोबत ते लोणावळा येथे आले होते. दुपारी दोनच्या सुमारास भुशी धरणाच्या बॅकवॉटर भागात असलेल्या वॉटर फॉलजवळ ते गेले आणि बॅकवॉटर भागात बुडाले.
स्थानिकांनी तत्काळ ही माहिती लोणावळा पोलीस आणि शिवदुर्गमित्र यांना दिली. लोणावळा पोलीस, शिवदुर्गमित्रचे आपदामित्र आणि स्थानिक युवक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अर्धा तास शोधकार्य केल्यानंतर दोन्ही युवकांचे शव पाण्याबाहेर काढण्यात आले. याबाबत लोणावळा शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून महादेव म्हेत्रे अधिक तपास करीत आहेत. दरम्यान, या दुर्घटनेमुळे लोणावळा, भुशी धरण परिसरात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.