न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२५) :- पुणे जिल्ह्यात भेसळयुक्त पनीर विक्री करणाऱ्या १६६ पनीर विक्रेत्यांच्या पनीरचे नमुने तपासणीसाठी जमा करण्यात आले असून, तब्बल १० हजार ३८८ किलो म्हणजेच तब्बल २४ लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचे भेसळयुक्त पनीर अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केले असल्याची माहिती अन्न प्रशासन विभागाकडून देण्यात आली.
शुद्ध पनीर तयार करण्यासाठी पाणी न घातलेल्या दुधाचा वापर केला जातो. दुधाला ९० डिग्री तापमानापर्यंत गरम करून घेऊन नंतर ते १० मिनिटे तसेच गरम ठेवले जाते. त्यानंतर त्यात तुरटीचे मिश्रण करून घेऊन दूध चांगले फोडून घेतले जाते. हेच फुटलेले दूध एका सुती कापडात गुंडाळून ठेवावे लागते. त्यानंतर फाटलेल्या दुधाला कापडात गुंडाळून त्यावर पनीरच्या वजनाच्या दुप्पट वजन त्यावर ठेवावे लागते. १५ मिनिटांनंतर ते पनीर पाण्यातून काढून घेतले जाते. तयार झालेल्या पनीरवर तुपासारखा तवंग आल्याचा दिसून येतो; शिवाय त्याचा तुपासारखा सुगंध येतो. त्यानंतर तयार झालेले शुद्ध पनीर फ्रिजमध्ये सुरक्षित ठेवले जाते.
खुल्या बाजारात मिळणारे पनीर शुद्ध असतेच असे नाही; पनीर खरेदी करताना खात्रीच्या दुकानातूनच खरेदी करावे. दुग्धजन्य पदार्थ विक्रीच्या दुकानात पनीरचे बंद पॅकेट मिळते. उत्पादन तिथी, एक्स्पायर तिथी आणि त्यावरील परवाना क्रमांक पाहूनच खरेदी करावी.
सुरेश अन्नापुरे, सहआयुक्त, अन्न प्रशासन विभाग, पुणे…