न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ जून २०२५) :- डॉक्टर महिलेला माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण करून छळ केल्याप्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पती महेश सुरेश शेळके, सासु द्वारका सुरेश शेळके, सासरे सुरेश चंदरराव शेळके (सर्व रा. खराडी बायपास, पुणे) यांसह नणंद सोनाली विवेक नेवाळे (रा. पिंपरी) आणि चैताली प्रफुल्ल रनवरे (रा. वाघोली, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत डॉ. पूजा महेश शेळके (२८, रा. बाबूरावनगर, शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. डॉ. पूजा शेळके या येरवडा येथील नामांकित हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. गेल्या वर्षभरात (जानेवारी २०२४ पासून) त्यांचे पती महेश आणि कुटुंबातील इतरांनी तुझ्या बापाकडून पैसे घेऊन ये, असे म्हणत मारहाण केली.
शिवीगाळ, दमदाटी करीत सतत अपमानित केले, तसेच डॉ. पूजा यांचे वडील, आई व भावालाही वारंवार फोन करून शिवीगाळ केली. डॉ. पूजा शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शिरुर पोलिसांनी त्यांच्या पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार दीपक राऊत करीत आहेत.