न्यूज पीसीएमसी नेटवर्क
शिरूर (दि. २३ मे २०१९) :- राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि मित्र पक्षाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांनी सलग तीन वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा निसटत्या मताधिक्क्याने पराभव केला आहे.
राजकारणाची कोणतीही पार्श्वभूमी नसलेले व नवखे उमेदवार कोल्हे यांची केवळ छत्रपती शिवाजी व छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रपट मलिकेतील चरित्र अभिनेते एवढीच ओळख. मात्र, त्यांनी बलाढ्य व अनुभवी विद्यमान खा. आढळराव यांचा पराभव करून भल्याभल्यांचे राजकीय गणिते बिघडविली आहेत.
खा. आढळराव यांना पाच लाखांच्या वर तर डॉ. अमोल कोल्हे यांना सहा लाखांच्यावर मते मिळाली आहेत. डॉ. कोल्हे यांनी आढळराव यांचा जवळपास पन्नास हजारां पेक्षा अधिक मतांच्या फरकाने पराभव केला आहे. अधिकृत आकडेवारी निवडणूक विभागाकडून जाहीर होण्यास विलंब होणार असला तरी, खा. आढळराव यांचा एका नवख्या उमेदवाराने पराभव करून, राष्ट्रवादीला शिरूरच्या राजकारणात प्रवेश मिळवून दिला आहे.











