न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १० जून २०२५) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनीच मोठा राजकीय सूर वातावरणात घुमला. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि सध्या प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील यांनी “मला प्रदेशाध्यक्ष पदातून मुक्त करा” अशी स्पष्ट आणि थेट मागणी शरद पवार यांच्याकडे केली आहे. यामुळे पक्षात नेतृत्वाच्या पातळीवर मोठ्या बदलाची शक्यता व्यक्त होत आहे.
जयंत पाटील म्हणाले, “ही लढाई तुकाराम विरुद्ध नथुराम अशी आहे आणि आम्ही तुकारामांच्या बाजूने आहोत.” त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही जोरदार हल्ला चढवला. “शिवभोजन थाळी बंद झाली, अनाथांसाठीचे पैसे वळवले जात आहेत, महापालिकांवर प्रशासक बसवले जात आहेत, निवडणुका टाळल्या जात आहेत,” अशी ताशेरेबाजी त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
जयंत पाटील पुढे म्हणाले, ” जितेंद्र आव्हाड अजूनही शरद पवार साहेबांना घाबरतात!” तसेच, न्यायालयीन संस्थांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करत, “न्यायाधीशांकडे पैसे सापडतात पण कोणतीही कारवाई होत नाही,” असे सांगत जयंत पाटलांनी यंत्रणांवरही निशाणा साधला. पक्षात कार्यकर्त्यांच्या नाराजीचेही त्यांनी गांभीर्याने उल्लेख केले. “कार्यक्रमात सर्वांना बोलवू शकलो नाही याची जबाबदारी माझी,” असंही जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.











