न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १० जून २०२५) :- राज्यात अकरावी प्रवेशाची प्रक्रिया केंद्रीय आणि ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. याची अंतिम गुणवत्ता यादी बुधवारी (दि. ११) घोषित करण्यात येईल, अशी माहिती प्रभारी शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी दिली. दरम्यान, अर्ज लॉक करण्यास मुदतवाढ द्यावी लागल्याने वेळापत्रकात बदल होऊन अंतिम यादी रविवारी ऐवजी बुधवारी प्रसिद्ध होत आहे.
दरम्यान, तब्बल ८४ हजार विद्यार्थ्यांनी अर्जाचा भाग-१ भरलेला, पण भाग २ लॉक केलेला नव्हता. त्यांना अर्ज लॉक करण्यासाठी १ दिवसाचा अधिकचा कालावधी दिला होता. आतापर्यंत १२ लाख ७१ हजार अर्ज प्राप्त झाले असून, त्यावरून अंतिम गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामुळे गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांचे अलोकेशन करण्यास, शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेश निश्चित करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. प्रत्येक फेरीपूर्वी विद्यार्थ्याने संमती नोंदवणे आवश्यक आहे, प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील फेरीत प्रवाह व पसंतीक्रम अद्ययावत करण्याची सुविधा असेल, असेही सांगण्यात आले.
प्रवेश प्रक्रियेचा तपशील…
१२ ते १४ जून :- शून्य फेरीप्रवेश :- व्यवस्थापन कोटा, संस्था अंतर्गत कोटा, अल्पसंख्याक कोटा याअंतर्गत विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर ‘प्रोसिड फॉर अॅडमिशन’वर क्लिक करावे. विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन मूळ कागदपत्रांची पडताळणी करून, विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे.
१७ जून :- कॅप फेरी प्रवेश : गुणवत्ता यादी आधारे विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड/वाटप प्रक्रिया, विद्यार्थी व उच्च माध्यमिक शाळा निवड / वाटप प्रक्रियेचे विभागीय समितीद्वारे परीक्षण.
२६ जून: कॅप फेरीप्रवेश – प्रवेश फेरीसाठी उच्च माध्यमिक विद्यालय निहाय विद्यार्थी वाटप यादी जाहीर, विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये उच्च माध्यमिक विद्यालय वाटप तपशील उपलब्ध होईल, उच्च माध्यमिक विद्यालयांना विद्यार्थ्यांचे वाटप यादी प्राप्त होईल, फेरीनिहाय कट ऑफ-तपशिलाची प्रसिद्धी वेब पोर्टलवर प्रसिद्ध केले जाईल.
५ जुलै : फेरी क्रमांक २ साठी रिक्त जागांची यादी जाहीर करणे. विद्यार्थ्यास मिळालेले उच्च माध्यमिक विद्यालय मान्य असेल तर प्रवेश ‘प्रोसिड फॉर अॅडमिशन’वर क्लिक करावे, विद्यार्थ्याने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून व संबंधित विद्यालयात जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून, विहित शैक्षणिक शुल्क भरून प्रवेश निश्चित करणे, विद्यार्थ्यास मिळालेल्या विद्यालयात प्रवेश नको असल्यास, पुढील फेरीसाठी संमती देऊन सहभागी होता येईल, प्रवेशाची निश्चिती, प्रवेशास नकार व प्रवेश रद्दची नोंद शाळेच्या लॉगिनद्वारे केली जाईल, नवीन विद्यार्थ्यांसाठी पुढील फेरीसाठी नोंदणी व पसंतीक्रम भरणे हे संमती दिल्याच्या अटीवर सुरू राहील.
विद्यार्थ्यांनो हे करा…
- गुणवत्तेनुसार वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा असेल, तर विद्यार्थी लॉगिनमधून Proceed for Admission वर क्लिक करावे.
- आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि त्यानंतर वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात जाऊन विहित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी.
- वाटप झालेल्या उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश घ्यायचा नसेल, तर पुढील फेरीची वाट पाहू शकता. पण, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पहिल्या पसंतीचे उच्च माध्यमिक विद्यालय प्राप्त झाले आहे, त्यांनी संबंधित विद्यालयात प्रवेश घेणे बंधनकारक आहे.
- या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही किंवा त्यांचा प्रवेश नाकारण्यात आला, तर त्यांना पुढील नियमित फेरी (२ ते ४) साठी अपात्र ठरवले जाईल. सर्वांसाठी खुली फेरी यासाठीच विचारात घेतले जाईल.
- एखाद्या विद्यार्थ्याला निश्चित झालेला प्रवेश रद्द करायचा असेल, तर त्याने संबंधित उच्च माध्यमिक विद्यालयाकडे विनंती करावी व प्रवेश रद्द करून घ्यावा. त्या नंतरच्या नियमित फेरीसाठी असे विद्यार्थी देखील अपात्र ठरवले जातील.
- विद्यार्थी नोंदणी शुल्क केवळ डिजिटल पद्धतीनेच स्वीकारले जाईल.
- शून्य फेरी व्यवस्थापन, इनहाऊस आणि अल्पसंख्याक कोटा अंतर्गत प्रवेश दि. १२ ते १४ जून दरम्यानच होतील.
माहितीसाठी अधिकृत पोर्टल
https://mahafyjcadmissions.in ई-मेल आयडी, support@mahafyjcadmissions.in हेल्पलाइन नंबर : ८५३०९५५५६४, https://mahafyjcadmissions.in ई-मेल आयडी support@mahafyjcadmissions.in हेल्पलाइन नंबर : ८५३०९५५५६४.