न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. ११ जून २०२५) :- देश विकसित होण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या महापालिकांनी आर्थिक बाबतीत आत्मनिर्भर व्हायला पाहिजे, असा आग्रह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सातत्याने राहिला आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत पिंपरी चिंचवड महापालिकेने हरित कर्जरोखे जारी केले. अशा ‘कॅपिटल मार्केट’मधून निधी उभारणारी पिंपरी-चिंचवड ही देशातील पहिली महापालिका ठरली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी काढले.
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा हरित कर्जरोखे मुंबई शेअर बाजारात लिस्टिंग कार्यक्रम बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमधील बीएसई आंतरराष्ट्रीय सभागृहात झाला. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे, उमाताई खापरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त मुख्य सचिव असिम गुप्ता, प्रधान सचिव डॉ. के. गोविंदराज, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक सुंदरम रामामूर्ती व्यासपीठावर उपस्थित होते.
शेअर बाजारात कर्जरोखे ‘लिस्टिंग’ करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट आहे. ‘कॉर्पोरेट’ अटी-शर्तीची पूर्तता करीत ‘लिस्टिंग’ची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. या निधीतून पायाभूत सोयीसुविधांची कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. ही कामेही हरित पद्धतीची, पर्यावरणपूरक आणि शाश्वत विकासाची असणार आहेत. केंद्र शासनाकडूनही हरित कर्ज रोखे इश्यू केल्यामुळे २० कोटींचे प्रोत्साहनपर अनुदानही महापालिकेला प्राप्त झाले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
हरित कर्जरोख्यांद्वारे महापालिकेने २०० कोटी रुपयांचा निधी यशस्वीरीत्या उभारला आहे. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (बीएसई) च्या इलेक्ट्रॉनिक निविदा प्रणालीवर खासगी गुंतवणुकीच्या माध्यमातून हरित कर्जरोखे इश्यू करण्यात आले होते. गुंतवणूकदारांचा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर असलेला विश्वास अधोरेखित करत, इश्यू सुरू होताच केवळ एका मिनिटात १०० कोटी रुपयांचा मूळ भाग भरला गेला, तर एकूण ५१३ कोटी रुपयांच्या निविदा प्राप्त झाल्या, म्हणजेच रोख्याला ५.१३ पट अधिक मागणी मिळाली. हरित कर्ज रोखे इश्यूला क्रिसिल आणि केअर या मान्यताप्राप्त संस्थाकडून ‘एए’ पतमानांकन प्राप्त झाले आहे. हरित कर्जरोख्यातून उभारलेला निधी निगडी प्राधिकरणातील हरित सेतू प्रकल्प आणि गवळीमाथा ते इंद्रायणीनगर चौकदरम्यानचा टेल्को रस्ता विकास प्रकल्प या दोन महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहे.











