- आठ ते दहा वर्षांपासून एकाच विभागात मांडले ठाण..
- कारभाराची चौकशी लावून इतरत्र बदली करा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ जून २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या विद्युत विभागातील मुख्य लिपिक मुरगू बोठे हे पालिकेचे जावई आहेत काय? तब्बल आठ ते दहा वर्षांपासून ते एकाच विभागात ठाण मांडून आहेत. वरिष्ठांची मर्जी सांभाळत इतक्या वर्षात त्यांनी ठेकेदारांशी अर्थपूर्ण सलगी केली आहे. त्यामुळे त्यांची बदली होत नाही? असा सवाल कर्मचाऱ्यांकडून उपस्थित होत आहे.
विभागप्रमुख असल्याचा तोरा मिरवीत स्वतःच्याच पद्धतीने ते विभागाचा कारभार हाकतात. डोईजड होणाऱ्या कर्मचाऱ्याची वरिष्ठांमार्फत प्रशासनाकडे तक्रार करून बदली केली जाते. चक्क विद्युत विभागातील कार्यालय अधीक्षकांच्या कामकाजाचा गाडा हे महाशय हाकतात, असा त्यांच्यावर कर्मचाऱ्यांमधूनच आरोप होत आहे.
विद्युत विभागातील अधिकाऱ्यांसह कर्मचारी त्यांच्या दबावाखाली काम करत असल्याची माहिती सूत्रांकडून समजली आहे. मुख्य लिपिकाच्या कारभाराची चौकशी लावून त्यांची इतरत्र बदली करावी, अशी मागणी काही कर्मचाऱ्यांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
याबाबत मला काहीही माहित नाही. माहिती घेऊन सांगतो. जर बोठे बरेच वर्ष त्या जागी असतील तर, प्रशासनाने त्यांची बदली केली असती. त्यांच्याकडे जास्त काम नाही. ते वरिष्ठ लिपिक आहेत. त्यांच्याकडे फक्त आस्थापनेचे काम आहे.
– नितीन देशमुख, कार्यकारी अभियंता – विद्युत विभाग मनपा…











