- रहाटणी प्रभाग क्रमांक २७ मध्ये भाजपची तीन नावे चर्चेत..
- भाजयुमोचे मा. शहराध्यक्ष राज तापकीर यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
रहाटणी (दि. १२ जून २०२५) :- सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरच्या आधी महापालिका निवडणूक घेण्याचे आदेश दिल्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकांचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच प्रभाग रचनेचा आदेश येऊन ठेपल्यामुळे महापालिका निवडणुक लढण्यास इच्छुक उमेदवार सज्ज झाले आहेत. पक्ष कोणाला उमेदवारी देईल? हे अजून गुलदस्त्यात आहे. तरीही इच्छुकांनी वरिष्ठांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. ‘फिल्डिंग’ लावण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान प्रभाग क्रमांक २७ रहाटणी येथील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला असता भाजपकडून पुरुष गटासाठी प्रामुख्याने राज दादा तापकीर, चंद्रकांत अण्णा नखाते, देविदास तांबे यांच्या नावांची चर्चा सुरु आहे.
युवा नेतृत्व आणि भाजयुमोचे मा. शहराध्यक्ष राज तापकीर यांना राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा बाबासाहेब तापकीर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे प्रथम अध्यक्ष होते. त्यांनी प्रभागामध्ये विकासाचा झंझावात निर्माण केला. तसेच तापकीर यांच्या आई सुनिता हेमंत तापकीर या देखील २०१७ च्या निवडणुकीत नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली. स्मार्ट सिटी अंतर्गत प्रभागातील बहुतांश रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्यात त्यांचे योगदान आहे. या दोघांच्या पाऊलावर पाउल ठेवत त्यांचा आदर्श घेत राज तापकीर यंदा निवडणुकीच्या आखाड्यात मोठ्या ताकदीने उतरणार असल्याची प्रभागात चर्चा आहे. त्यातच ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय देखील आहेत. यंदाच्या महापालिका निवडणुकीत तरुणांना संधी देण्याचे धोरण पक्षाने आखले आहे. त्यामुळे रहाटणी प्रभागातून आताच त्यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे.
भाजपचे जेष्ठ नेते मा. नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते यांचा रहाटणी हा बालेकिल्ला समजला जातो. पंधरा वर्षांचा नगरसेवक पदाचा गाढा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. प्रभागाचा विकासपुरुष म्हणून त्यांची खरी ओळख. नुकतीच पार पडलेली विधानसभा निवडणुक भाजपकडून लढविण्यावर ते ठाम असताना ऐनवेळी पक्ष नेतृत्वाने त्यांना सबुरीचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांना निवडणुकीतून माघार घ्यावी लागली. पक्षाशी निष्ठा राखल्याने महापालिका निवडणुकीसाठी त्यांनाही भाजपची प्रथम पसंती असल्याची प्रभागात चर्चा सुरु आहे.
उभरते नेतृत्व म्हणून देविदास तांबे हे देखील यंदाच्या महापालिका निवडणुकीत नशीब आजमावण्यास सज्ज झाले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे समाजकार्य सुरु आहे. एमएनजी पाईपलाईन प्रत्येक सोसायटीमध्ये पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले, त्यात त्यांना यश देखील आले. विधानसभेमध्ये जास्तीत जास्त लीड मिळवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. पक्षाने दिलेले विविध उपक्रम त्यांनी धडाडीने प्रभागात राबवले आहेत. त्यामुळे जनतेशी त्यांची नाळ जुळलेली आहे. रहाटणी प्रभागात बहुधा सोसायटी वर्ग वाढला असून त्यांच्याशी जवळीक साधण्यात त्यांना यश आले आहे. शंकर जगताप यांच्याशी जवळीक साधण्यात देखील त्यांना यश आले आहे. यंदा काहीही झाले तरी निवडणूक लढायची, असा निर्धार त्यांनी केल्याचे समजते.
















