- नागरिकांच्या मदतीमुळे ‘गाड्या’ वाचल्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२५) :- चऱ्होलीतील भोसले वस्ती भागातील ओढ्याच्या परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे चारचाकी, दुचाकी वाहने वाहून गेल्याचे दृश्य पाहायला मिळाले. वाहत जात असलेली वाहने नागरिकांनी पाण्याबाहेर काढल्याने अनर्थ टळला.
प्राईड वर्ल्ड सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावरच ओढा असून बाजूने संरक्षक भिंत नसल्यामुळे नागरिकांना अंधारात पाण्याचा अंदाज आला नाही. या रस्त्यावरून जाताना अतिरिक्त धाडस दाखवणाऱ्या काही नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहात आपले वाहन चालवण्याचा प्रयत्न केला.
जोरदार पावसामुळे ओढ्याला वेगाने पाणी वाहत होते. परंतु ओढ्याला भिंत नसल्याने वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज येत नव्हता. परंतु तरीही काही नागरिकांनी त्यांची वाहने या रस्त्याने नेण्याचा प्रयत्न केला. परंतु पाण्याचा जोर जास्त असल्याने या प्रवाहात पाच चारचाकी तर दोन दुचाकी वाहने वाहत गेली. मात्र, उपस्थित स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत तात्काळ मदतीचा हात देत ही वाहने पाण्याबाहेर काढून वाहनचालकांना मदत केली. घटनास्थळी दिघी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बापू ढेरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत घटनास्थळाची पाहणी करून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले.











