न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२५) :- दहावीत एक किंवा दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी एटीकेटी सवलत लागू करण्यात आली आहे. हा ‘एटीकेटी’चा फॉर्म भरून पुन्हा परीक्षा देऊ शकतात. या परीक्षेचा लाभ घेण्यासाठी यंदा ३४ हजार ३९३ विद्यार्थी पात्र आहेत. या एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा असेल, तर त्यांना दहावीमध्ये विज्ञान विषयात ४० टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
विशिष्ट परिस्थितीत एक किंवा दोन विषयांत दहावीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात किंवा वर्षात प्रवेश घेण्याची परवानगी मिळणे म्हणजे एटीकेटी (अलाउड टू कीप टर्म्स) होय. यासाठी यंदा ३४ हजार ३९३ विद्यार्थी अर्ज करू शकणार आहेत, असे दहावीच्या निकालानंतर स्पष्ट झाले होते. एटीकेटीअंतर्गत विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश घेण्याची परवानगी असली तरी, त्यांना नापास झालेले पेपर किंवा विषय नंतरच्या परीक्षेत उत्तीर्ण करणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा निकाल लवकर जाहीर करण्यात आला. नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये म्हणून पुरवणी परीक्षाही वेळेत घेतली जात आहे. दहावीची पुरवणी परीक्षा २४ जून ते ८ जुलै दरम्यान घेतली जाणार आहे.
राज्य मंडळाने परीक्षेचे विषयनिहाय वेळापत्रक www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून दिले आहे. हे वेळापत्रक माहितीसाठी असून, परीक्षेपूर्वी राज्य मंडळातर्फे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे.
मूळ कागदपत्रांची पडताळणी आवश्यक…
दहावी बोर्डाचे मार्कशीटची मूळ प्रत आणि छायाप्रत दोन्ही आवश्यक. शाळा सोडल्याचा दाखला (टीसी) मूळ प्रत आणि छायाप्रत दोन्ही आवश्यक. आरक्षित प्रवर्गातून असाल, तर जात प्रमाणपत्र सादर करावे लागेल. ओळखपत्र म्हणून आधार कार्ड किंवा इतर कोणताही शासकीय पत्ता पुरावा आवश्यक. उत्पन्नाचा दाखला किंवा अल्पसंख्याक प्रमाणपत्र (जर लागू असेल) आवश्यक आहे.