न्यूज पीसीएमसी नेटवर्क
लोणावळा (दि. २२ जून २०२५) :- वडील व मुलगी यांच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. लोणावळा शहराजवळील कुसगाव बुद्रुक हद्दीत जन्मदात्या पित्यानेच आपल्या १३ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीची पत्नी व पीडितेची आई यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २० जून २०२५ रोजी सायंकाळी ही अमानुष घटना घडली. कुसगाव बुद्रुक हद्दीत राहत्या घरात पीडित मुलगी एकटी असताना तिच्या पित्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. आरोपीला मुलगी अल्पवयीन असल्याची पूर्ण कल्पना होती, तरीही त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना कुणालाही न सांगण्यासाठी मुलीला मारण्याची धमकीही आरोपीने दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.क. ६४ (२) (एफ), ६५ (१) सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम २०१२ (पोक्सो कायदा) चे कलम ४, ८, १२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास म.स.पो.नि. विजया म्हेत्रे करीत आहेत.











