न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. २२ जून २०२५) :- चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी विद्यार्थ्यांनी विविध योगासनांचे सादरीकरण केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार, प्राणायाम व विविध योग क्रिया सादर केल्या.
कार्यक्रमामध्ये शिक्षकवर्ग, शालेय कर्मचारी आणि पालकांचाही सहभाग उत्स्फूर्त होता. योग शिक्षक प्रीती मुकाती यांनी योगाचे शारीरिक व मानसिक आरोग्यावर होणारे फायदे समजावून सांगितले. मुख्याध्यापिका सुविधा महाले यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत नियमित योगाभ्यासाचे विद्यार्थ्यांनी जीवनात पालन करण्याचे आवाहन केले. शाळेचे संचालक संदीप काटे सरांनी ‘योग करा, रोग टाळा आणि आनंदी जीवन जगा’ असा संदेश विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी शाळेच्या उपसंचालिका अनिताताई काटे, शाळेचे डायरेक्टर निहारा काटे, लीना काटे, गणेश पवार, शिवराम लटपटे, शुभाष संकपाळ, सचिन जोशी, संदेश काटे, ऋषिकेश भगत, भास्कर निकम, राहुल अरमारकर, प्रकाश देवपूजारी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

















