न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २४ जून २०२५) :- नगरविकास विभागाने सोमवारी राज्यभरातील महानगरपालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचे विविध टप्पे आणि त्यासाठी जबाबदार असलेले संबंधित अधिकारी याबाबत शुद्धिपत्रक जारी केले. प्रभाग रचनेचा प्रस्ताव आता सरकारमार्फत राज्य निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे.
नगरविकास विभागाने १० जून रोजी मुंबईसह २९ महापालिका तसेच नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याचे आदेश जारी केले होते. त्यानुसार मुंबईसह अ, ब, क आणि ड महापालिका क्षेत्रातील प्रभाग रचनेचे प्रारूप तयार करण्याची जबाबदारी संबंधित महापालिका आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे. त्यानुसार आयुक्तांकडून थेट राज्य निवडणूक आयोगाला प्रभाग रचना प्रारूप सादर होणे अपेक्षित होते. नगरविकास विभागाने सोमवारी शुद्धिपत्रक काढून प्रभाग रचना सादर करण्याबाबत विविध टप्पे जाहीर केले आहेत.
मुंबईसह प्रत्येक महापालिकेला नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आणि प्रधान सचिवांना प्रभागांची प्रारूप रचना सादर करावी लागणार आहे. त्यानंतर नगरविकास विभागाकडून छाननी होऊन प्रभाग रचनेच्या मान्यतेचा प्रस्ताव राज्य निवडणूक आयोगाला सादर होईल. आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर सरकारने प्राधिकृत केलेला अधिकारी सुनावणी घेईल. या सुनावणीनंतर प्रभाग रचनेचा मसुदा महापालिका आयुक्त नगरविकास विभागाला सादर करतील.
हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडून पुन्हा निवडणूक आयोगाला सादर होईल. त्यावर राज्य निवडणूक आयोग अंतिम शिक्कामोर्तब करेल. राज्य निवडणूक आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर आयुक्तांकडून अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध केली केली जाईल. अ, ब आणि क वर्ग महापालिकांच्या प्रभाग रचनेसाठी हीच पद्धती अवलंबवली जाणार आहे. ड वर्ग महापालिकेत प्रभाग रचना तयार करून महापालिका आयुक्त त्याचा आराखडा जिल्हाधिकाऱ्यांना सादर करतील. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा प्रस्ताव नगरविकास विभागाला मान्यतेसाठी पाठवला जाईन. पुढे नगरविकास विभागाकडून राज्य निवडणूक आयोगाला प्रभाग रचनेचा प्रस्ताव पाठवण्यात येईल. नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील प्रभाग रचना संबंधित मुख्याधिकारी यांच्याकडून केली जाईल. नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रभाग रचनेचा प्रस्ताव संबंधित जिल्हाधिकारी नगरविकास विभागाला सादर करतील.
















