- कॉंग्रेस नेते तथा खा. राहुल गांधी यांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
मुंबई (दि. २४ जून २०२५) :- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत कॉंग्रेस नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी सातत्याने आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी निवडणुक आयोगाकडे तक्रारही केली आहे. यानंतर आता राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर मतदारसंघात झालेल्या मतदार नोंदणीबाबत आक्षेप घेतला आहे. याबाबत त्यांनी ‘एक्स’वर एक पोस्ट शेअर केली आहे.
राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत लिहिले की, ‘महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात, मतदार यादीत फक्त ५ महिन्यांत ८% वाढ झाली. काही बूथवर २०-५०% वाढ झाली. अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचे वृत्त बीएलओनी (बूथ लेव्हल ऑफिसर) दिले. माध्यमांनी केलेल्या पडताळणीत पत्त्याशिवाय हजारो मतदार असल्याचे उघड झाले आणि निवडणूक आयोग? गप्प आहे की यात सहभागी? ही मत चोरी आहे. म्हणूनच आम्ही मशीन रीडेबल डिजिटल मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज त्वरित प्रसिद्ध करण्याची मागणी करत आहोत.’
दरम्यान, राहुल गांधी यांनी यापूर्वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूकांवर आरोप करत एक लेख लिहिला होता. त्यात महाराष्ट्रानंतर बिहारमध्ये मॅच फिक्सिंग होण्याची भीती व्यक्त केली होती. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सडेतोड उत्तर दिले होते. त्यांनी पुराव्यांसह सर्व आरोप खोडून काढले होते. पराभव स्वीकारुन आपण कुठे चुकतो आहोत, जनतेशी आपला कनेक्ट कुठे कमी पडतो, त्यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार केला तर ते अधिक संयुक्तिक ठरेल, असा टोला फडणवीस यांनी राहुल गांधींना लगावला होता.
















