- राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफांनी टोचले अबू आझमींचे कान…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ जून २०२५) :- वारीमुळे वाहतुकीला अडथळा होतो, असे विधान समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी केले होते. ज्यानंतर राजकीय प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटले की, “अबू आझमी यांना वारी, वारकरी संप्रदायाबद्दल माहिती नाही असे दिसते. त्यातून त्यांनी हे विधान केले असेल. वारीचा मार्ग ठरलेला असतो. वर्षानुवर्षे त्या मार्गावरून वारी सुरू आहे. शासनाने त्यासाठी पालखी मार्गही बनवला आहे.”
“नमाज ही दिवसातून पाचवेळा असते, तर वारी वर्षातून एकदा असते. नमाजही अशा ठिकाणी असला पाहिजे जेथे कोणाला त्रास होणार नाही. अबू आझमी भेटले की त्यांना वारी म्हणजे काय हे समजावून सांगतो,” असंही मुश्रीफ म्हणाले आहेत.
तर, अबू आझमी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी माफी मागितली असून, त्यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. “जर माझ्या वक्तव्यामुळे वारकरी समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील, तर मी माझे शब्द पूर्णपणे मागे घेतो आणि सर्वांची माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता,” असे अबू आझमी यांनी म्हटले आहे.