न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जून २०२५) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने मंगळवार (२४ जून) रोजी चिंचवड परिसरातील एका रस्तावर पडलेले झाड हटवत अवघ्या काही वेळात रस्ता वाहतुकीसाठी खुला करून दिला आहे. या मोहिमेदरम्यान एक प्रशिक्षणार्थी जवान किरकोळ जखमी झाला आहे.
चिंचवड परिसरात चिंचवड स्टेशनच्या बाजूने जाणाऱ्या रस्त्यावर मंगळवारी दुपारी पावणे तीनच्या सुमारास झाड कोसळले होते. त्यामुळे या रस्त्यावरील दोन्ही बाजूने वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या आकुर्डी प्राधिकरण उपअग्निशमन केंद्राच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली.
या पथकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून चेन सॉच्या साहाय्याने झाड व्यवस्थित कापून बाजूला हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. प्रमुख अग्निशामक विमोचक संजय महाडीक यांच्या नेतृत्वाखाली यंत्रचालक विजय चव्हाण, प्रशिक्षणार्थी जवान शिवम चव्हाण, सूरज माने, राहुल जाधव, संचित पाटील यांनी ही कामगिरी केली. यावेळी प्रशिक्षणार्थी जवान शिवम चव्हाण झाडाच्या फांद्या हलवत असताना किरकोळ जखमी झाला असून त्याच्यावर घटनास्थळी प्राथमिक उपचार करण्यात आले.
















