- चार अल्पवयीन मुलासंह पाच जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवड (दि. 27 जुन 2025) :- वाल्हेकरवाडी येथे बुधवारी (दि. २५) रात्री मद्यधुंद अवस्थेतील टोळक्याने रस्त्याकडेला उभ्या केलेल्या कार, रिक्षा, टेम्पो अशा नऊ वाहनांची दगडाने तोडफोड केली. वाल्हेकरवाडी येथे रात्री अडीचच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील टोळके आले. त्यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा करीत नागरिकांनी रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांच्या काचा फोडल्या. दुचाकी ओढून फेकून दिल्या. कार, टेम्पो, रिक्षा अशा नऊ वाहनांना टार्गेट करून दगडाने त्यांची तोडफोड केली.
एवढ्यावरच न थांबता व्हिडीओ शूटिंग करीत वाहने पेटविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चार अल्पवयीन मुलासंह पाच जणांना पोलिसांनी जेरबंद केले. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गिरीश शशिकांत लोंढे (१९, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्या चार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. सहायक पोलिस आयुक्त सचिन हिरे यांनी याबाबत माहिती दिली.
विशेष म्हणजे, या संपूर्ण घटनेचे व्हिडीओ शूटिंग करीत ही तोडफोड करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी त्वरित हा प्रकार पोलिसांना कळविला. घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकासह इतर युनिटच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सीसीटीव्ही चित्रणाच्या आधारे पाच संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यानी गुन्ह्याची कबुली दिली. चारजण अल्पवयीन आहेत.
या प्रकाराच्या घटना घडू नयेत, यासाठी रात्र गस्त वाढविली आहे. रेकॉर्डवरील संशयितांची पुन्हा पडताळणी करण्यात येणार आहे.
– सचिन हिरे, सहायक पोलिस आयुक्त…
















