न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मे २०१९) :- प्रेम प्रकरणातून प्रेयसीचा खून झाल्याची घटना गुरुवारी उघड झाली आहे. किरण अरुण काते (२३) असं मयत प्रेयसीचं नाव असून अक्षय उर्फ आकाश विनायक लाखे (२०) असं आरोपी प्रियकराचं नाव आहे. दोघेही विवाहित असून मयत किरणला दोन मुलं आहेत. किरणच्या हत्येमुळे त्यांची दोन्ही मुलं कायमची पोरकी झाली आहेत. तर अक्षय याचं कुटुंबही उद्ध्वस्त झालं आहे. अक्षय आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून नुकतंच त्याचं लग्न झालं होतं.
सविस्तर माहिती अशी की, आरोपी अक्षय आणि मयत प्रेयसी किरण यांच्यात गेल्या काही वर्षापासून प्रेमसंबंध होते. मयत किरण ही विवाहित होती. दोन वर्षांपुर्वी तिच्या पतीचं निधन झालं होतं, तिला दोन मुलं देखील आहेत. पतीच्या निधनानंतर तिचे अक्षयसोबत प्रेमसबंध जुळले होते. ते नेहमी एकमेकांना भेटत असत. अक्षय हा पिंपरीमधील बहिणीकडे काही महिन्यांसाठी आला होता.
त्यानंतर अक्षयचा विवाह दुसऱ्या मुलीशी त्याच्या मूळ गावी नाशिक येथे झाला. त्याच्या कुटुंबात आई आणि वडील असून ते गंभीर आजाराने त्रस्त आहेत. आई धुणीभांडी करते, तर वडील घरीच असतात. काही दिवस किरण आणि अक्षयचा संपर्क झाला नाही. पण नंतर पुन्हा ते एकमेकांच्या संपर्कात आले. किरण अक्षयला मानसिक त्रास देत होती तसंच पैशांची मागणी करत असे. माझ्याशी लग्न कर असा तगादा तिने लावला होता.
दोन दिवसांपूर्वी अक्षय नाशिक येथून खडकी येथे मित्राच्या लग्नासाठी आला होता. त्यानंतर पिंपरीमधील बहिणीकडे आला असता किरणची भेट झाली. दोघे पिंपरी येथे जेवायला गेले. त्यानंतर दोघे हिंदुस्थान अँटिबायोटिक वसाहतीतील निर्जनस्थळी गेले, तिथे त्यांचं भांडण झालं. मयत किरणने अक्षयच्या कानशिलात लगावली. यामुळे चिडलेल्या अक्षयने तिचा गळा आवळला. किरण बेशुद्ध झाल्यानंतर अक्षयने मोठा दगड तिच्या डोक्यात घालून खून केला.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पिंपरी पोलिसांनी अवघ्या पाच तासात आरोपीला जेरबंद केलं. या घटनेचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याण पवार, गुन्हे पोलीस निरीक्षक उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांच्या पथकाने केली आहे.











