- एकाच कुटुंबातील चार जणांचा करुण अंत..
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
वाशिम (दि. 04 जुलै 2025) :- वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर गुरुवारी रात्री ९ च्या सुमारास भीषण अपघात झाला, ज्यात नागपूरच्या एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मृतक नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील रहिवासी आहे. हे सर्वजण पुण्याहून नागपूरला परत येत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जैसवाल कुटुंब पुण्यात एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते. गुरुवारी ते आपल्या कारने नागपूरकडे परत येत असताना, रात्री ९ च्या सुमारास वाशिम जिल्ह्यात त्यांच्या चालकाचा कारवरील ताबा सुटला. गाडी अनियंत्रित होत महामार्गावर धडकली. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला. अपघात इतका भीषण होता की, गाडीच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. घटनास्थळावरच आक्रोशाचे वातावरण निर्माण झाले होते.
अपघाताची माहिती मिळताच वाशिम पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गंभीर जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, पोलिसांनी अपघाताची नोंद घेत तपास सुरु केला आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गाडीचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, चालकाला डुलकी आली असण्याचाही संशय व्यक्त केला जात आहे.