- निविदा सहा कोटींची, पुरवठा आदेश ९.५ कोटींचा..
- महापालिकेत चाललय काय?…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 04 जुलै 2025) :- महापालिकेच्या भांडार विभागाकडून अभिलेख सुस्थितीत ठेवण्यासाठी ६ कोटींच्या मोबाइल कॉम्पॅक्टर रॅक खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती, परंतु ही प्रक्रिया एका ठेकेदाराला प्राधान्य देऊन करण्यात आली.
चार पात्र निविदाधारकांमध्ये मे. इंद्रनील टेक्नॉलॉजीज या कंपनीला काम दिले गेले आहे. मात्र, मोबाइल कॉम्पॅक्टरची निविदा ६ कोटींची असताना, भांडार अधिकाऱ्यांनी ९ कोटी ५३ लाख ७४ हजार २३२ रुपयांचा पुरवठा आदेश दिला आहे. यामुळे भांडार अधिकाऱ्याच्या मनमानी धोरणाची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागांच्या अभिलेख सुस्थितीत ठेवण्यासाठी भांडार विभागाने ६ कोटींच्या मोबाइल कॉम्पॅक्टर रॅकची खरेदी करण्यासाठी ई-निविदा सूचना क्र. ६३/२०२५-२६ ही १२ मार्च २०२५ पासून २ एप्रिल २०२५ पर्यंत प्रसिद्ध केली होती. या निविदेची अंदाजे किंमत सुमारे ६ कोटी ६ लाख रुपये आहे.
कामाचा पुरवठा आदेश देताना महापालिकेच्या अंतर्गत विविध विभागांसाठी अभिलेख कक्ष एकत्र करण्यासाठी महापालिका नेहरूनगर येथील नवीन इमारतीच्या दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर अभिलेख कक्ष तयार करण्यात येत आहे. नंतर करारनामा करताना त्या ठिकाणची प्रत्यक्ष जागेचे मोजमाप घेऊन त्यावर आधारित लेआऊट तयार करण्यात आले, ज्याप्रमाणे वाढीव प्रमाण पाहता मंजूर दराने एकूण ९ कोटी ५३ लाख ७४ हजार २३२ रुपयांचा पुरवठा आदेश देण्यात आला.
मोबाइल कॉम्पॅक्टर रॅक खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता आणि गुणवत्ता लक्षात न घेता, महापालिकेच्या भांडार विभागाकडून एका ठेकेदारालाच प्राधान्य देऊन राबविण्यात आल्याची तक्रार करण्यात येत आहे. तसेच भांडार अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराची चर्चा सध्या महापालिकेत सुरू आहे.
भांडार विभागाने ६ कोटींच्या कामांची निविदा एकाच ठेकेदाराच्या फायद्यासाठी काढली. त्याच ठेकेदाराला पात्र करून पुरवठा आदेश देताना ५ कोटी ८६ लाखांऐवजी ९ कोटी ५३ लाखांचा पुरवठा आदेश दिला आहे. यात कोणत्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, याचीही तपासणीची मागणी करत आहोत. या प्रकरणाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली जाईल.
– राहुल कोल्हटकर, सामाजिक कार्यकर्ते..
मोबाइल कॉम्पॅक्टर रॅक खरेदीसाठी निविदा प्रक्रिया राबवली आहे. सुमारे ६ कोटी रुपयांची खरेदी करण्यात येत आहे. मात्र, एकाच ठिकाणी सर्व विभागांचे रॅक एकत्र केल्याने निविदेतील मंजूर दराप्रमाणे ९ कोटी ५३ लाख रुपयांचा पुरवठा आदेश दिला गेला आहे. – नीलेश भदाणे, उपायुक्त, महापालिका…
















