- त्या जागेवर फलक लावण्याचे भूमि आणि जिंदगी विभागाकडून आदेश…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 04 जुलै 2025) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या रावेत येथील दोन एकर जागेवर ज्येष्ठ नागरिकांचे विरंगुळा केंद्र दाखवून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी अनधिकृत कार्यालय थाटून त्या जागेवर ताबा मारला होता.
ती जागा महापालिकेने तात्काळ ताब्यात घेऊन महापालिका मालकी हक्क असल्याबाबत फलक लावण्याचे आदेश भूमि आणि जिंदगी विभागाने दिले आहेत.
माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांची महापालिकेच्या दोन एकर जागेवर घुसखोरी? असे वृत्त ‘न्यूज पीसीएमसी’ने 26 जूनला प्रसिद्ध केले होते. सर्वसामान्यांच्या अतिक्रमणावर धडक कारवाई करणारे महापालिका प्रशासन माजी नगरसेवकाच्या अतिक्रमणावर कारवाई करीत नसल्याबद्दल शंका उपस्थित करण्यात आली होती. त्याची दखल घेऊन महापालिकेने ही कारवाई केली आहे.
सदर जागा महापालिकेची असल्याने त्या क्षेत्रावर महापालिका मालकी हक्काचा फलक लावण्यात यावा. त्या ठिकाणी झालेले बांधकाम हे कोणी व कसे बांधले आहे. त्या जागेवर अतिक्रमण झाले आहे का, याबाबत शहानिशा करून कारवाई करण्याचे आदेश व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना महापालिकेच्या भूमी आणि जिंदगी विभाागाचे उपायुक्त सीताराम बहुरे यांनी दिले आहेत.
















