न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 04 जुलै 2025) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक एप्रिल २०२५ पासून ई-ऑफिस हे डिजिटल कामकाज सुरू केले आहे. त्यात सातत्याने अनेक अडचणी येत आहे. सर्व्हर डाऊनची अडचण आता नित्याची झाली आहे. निगडी येथील कमांड अॅण्ड कंट्रोल सेंटरची वीज खंडित झाल्याने पालिकेच्या सर्वच विभागाचे कामकाज तीन दिवस विस्कळीत झाले.
महापालिका प्रशासनाने मोठा गाजावात करत डिजिटल कारभार सुरू केला. नवीन तंत्रज्ञानानुसार डिजिटल प्रणालीचा वापर करून ही संगणक यंत्रणा तयार करण्यात आली आहे. त्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. महापालिकेच्या सर्व विभागांतील फाईली व कागदपत्रांचे कामकाज बंद करून ऑनलाईन कम सुरू करण्यात आले.
या नव्या तंत्रज्ञानाच्या कामकाजास अनेक अडथळे येत आहेत. सर्व्हर संथ होणे. प्रणाली मध्येच बंद पडणे असे प्रकार घडत होते. त्यामुळे सुरुवातीचे दोन महिने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर दिले गेले नाहीत. त्यामुळे कर्मचारी वैतागले होते. त्यात मंगळवारपासून (दि. १) ती प्रणाली ठप्प झाली आहे. महापालिकेचे सर्व विभागांचे कामकाज जागेवर थांबले. केवळ तीन महिन्यांत डीएमएस प्रणाली ठप्प झाल्याने ठेकेदार एजन्सीवर अधिकारी संताप व्यक्त करत आहेत. या व्यवस्थेत अद्याप अनेक त्रुटी असून सातत्याने अडचणी येत आहेत. प्रत्येक फाईलच्या कामाला विलंब लागत आहे.
या प्रकल्पावर सुमारे ११२ कोटी रुपये खर्च झाला आहे. विभागप्रमुख, वरिष्ठ अधिकारी, प्रशासन अधिकारी, शाखा प्रमुख, लिपिक यांना प्रशासकीय कामकाजासाठी डिजिटल कोड देण्यात आले आहेत. एक हजार ७०९ डिजिटल स्वाक्षरी तयार करण्यात आल्या आहेत. महापालिकेच्या सर्व प्रकारच्या फाईली तयार करण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची प्रणाली वापरली जाते. प्रणालीचा वापर करून सर्व कागदपत्रांचे स्कॅनिंग, ट्रॅकिंग, सामायिकरण व शोध घेतला जात आहे. मात्र, तीन दिवसांपासून हे कामकाज विस्कळीत झाले आहे.
काम करताना या संगणक प्रणालीत वारंवार व्यत्यय येत आहे. एक फाईल सबमिट करण्यासाठी पाच मिनिटांपेक्षा अधिकचा वेळ जातो. इंटरनेट आणि वीजपुरवठा खंडीत झाल्यानंतर नव्याने सर्व प्रक्रिया करावी लागते. इंटरनेटला पाहिजे तेवढी गती नसल्याने कामकाज वेळेत पूर्ण होण्याऐवजी अधिकचा विलंब होत आहे. तसेच, अधिकारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्या जागी नियुक्त नव्या अधिकाऱ्याचे नावाने फाईली तयार होत आहेत.
















