न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 04 जुलै 2025) :- किरकोळ वादातून एका व्यक्तीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून कोयत्याचा धाक दाखवत वाहनांची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी (दि. १) रात्री बोपोडी ब्रिजजवळील इनामदार पोल्ट्री फार्मसमोर घडली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.
साकिब रफिक शेख (३२, रा. लोहगाव), रवी मसलिंगाप्पा लकाबशेट्टी (२४, रा. विश्रांतवाडी), मोहसीन हनीप शेख (२०, रा.येरवडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या प्रकरणी मोईउद्दीन ऊर्फ मुन्ना रफिक शेख (२९, रा. दापोडी) यांनी याप्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोईउद्दीन हे त्यांचे मित्र रेहान शेख, सैफ आणि नईम ऊर्फ भुऱ्या यांच्यासह एका रिक्षात बसले होते. त्या वेळी आरोपी साकिब शेख हा त्याचे साथीदार रवी आणि मोहसीन यांच्यासह तिथे आला. जुन्या भांडणाच्या कारणावरुन आरोपी साकिबने फिर्यादी मुन्ना यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी त्याने शिवीगाळ करत मोठमोठ्याने आरडाओरडा करून मुन्ना यांना जीवे मारण्याची धमकी दिली. कोयत्याने मुन्ना यांच्यावर वार करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. भांडण सोडविण्यासाठी येणाऱ्यांनादेखील मारण्याची धमकी आरोपींनी दिली. त्यानंतर आरोपींनी परिसरातून वाहनांची तोडफोड करून कारमधून पळ काढला.