- नागरिकांना सारावली भलीमोठी बीलं…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 05 जुलै 2025) :- पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी नवीन पाईपलाईन टाकून प्रत्येक नळजोडला स्मार्ट मीटर बसविण्यात आला आहे. यामुळे पाणी बचत आणि पाणीचोरीच्या प्रकारांना आळा बसण्यास मदत होईल, असा दृष्टिकोन आहे.
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये ९० टक्केंपेक्षा जास्त पाणी मीटर बसविण्यात आले आहेत. पाणीपुरवठा विभागाने दर तीन महिन्याला मीटरचे रीडिंग घेऊन जाणे अपेक्षित आहे; परंतु त्यांच्या नाकर्तेपणामुळे पिंपळे गुरव परिसरातील नागरिकांना नाहक आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत असल्याची तक्रार करण्यात आली आहे.
पिंपळे गुरवमधील पाणीमीटरचे रीडिंग वेळेवर न घेतल्यामुळे नागरिकांना वाढीव पाणीबिलाचा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना दर तीन महिन्यांनी पाणीपट्टीचे रीडिंग घेऊन पाणीपट्टीचे बिल देण्यात येते. या वेळेस पाच महिन्यांनी उशिरा पाणीमीटरचे रीडिंग घेतल्यामुळे नागरिकांना एकदम मोठे बिल दिल्यामुळे नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना हा मनस्ताप सहन करावा लागला आहे.
सुदर्शननगर, पिंपळे गुरव आणि अन्य भागातील नागरिकांनी या संदर्भात तक्रारी नोंदवल्या असून, पाणी वापर सामान्य असतानाही हजारोंच्या घरात बिल येत आहे. कारण मीटरचे रीडिंग वेळेवर घेतले जात नाही, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी दिली. तीन महिन्याला ४०० ते ५०० रुपये येणारे पाणी बिल अचानक ८०० ते १२०० रुपये आले आहे. हे सामान्य कुटुंबासाठी परवडणारे नाही. पाणीपुरवठा विभागाने वेळेवर रीडिंग घेऊन नियमित व योग्य पाणीबिल देण्याची मागणी नागरिकांनी महापालिकेकडे केली आहे.
पाणीपट्टी बिल मंथली बेसवर कॅल्क्युलेट केले जात आहे. जरी रीडिंग घेण्यात मागे पुढे झाले तरी बिलिंग जे होते ते मंथली बेसवर होते. मंथली बेसवरच स्लॅब हा कॅल्क्युलेट केला जातो. त्यामुळे बिलात तफावत येत नाही.
– अजय सूर्यवंशी, सहशहर अभियंता, पाणीपुरवठा विभाग, मनपा…