पीएमआरडीएची मोठी कारवाई; अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना चाप..
- हिंजवडीत चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 05 जुलै 2025) :- हिंजवडीतील आपत्कालीन पूर परिस्थितीला कारणीभूत ठरणाऱ्या तसेच ओढे – नाल्यांवर अनाधिकृतपणे अतिक्रमण करणाऱ्यांनी आपापसात कट रचुन ओढया नाल्याच्या प्रवाहाची दिशा बदलली. त्याठिकाणी अनाधिकृत बांधकाम करुन लोकांच्या जीवीतास धोका निर्माण केला आहे.
हा प्रकार (दि.०४) दरम्यान हिंजवडी येथील गट नं. नाला १५२ आणि २६३ च्या मध्ये घडला.
याप्रकरणी हरिष माने यांनी आरोपी १) शशिकांत साखरे, शालिवाहन साखरे (जागा मालक), २) विठ्ठल मोनाजी तडकेवार / गुरुकृपा बँगल स्टोअर (विकासक) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. त्यावरून हिंजवडी पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हिंजवडी, माण आणि मारुंजी भागातील नैसर्गिक ओढे – नाल्यांभोवती अनाधिकृतपणे बांधकाम तसेच पाण्याचा प्रवाह अडवल्यासह परस्पर इतरत्र वळल्याने काही दिवसापूर्वी हिंजवडीत पूर परिस्थिती निर्माण झाली होती. या अनुषंगाने हिंजवडी येथील नाल्यां लगत / नाल्याच्या पात्रात अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर शुक्रवारी सायंकाळी हिंजवडी पोलीस ठाण्यात ४ गुन्हे नोंदविण्यात आले. पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या निर्देशानुसार संबंधित कारवाई करण्यात आली.
अनधिकृत इमारतीचे निष्कासन…
मारुंजी भागातील अनाधिकृत बांधकाम आणि इमारतींवर पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभाग गत काही दिवसापासून निष्कासन कारवाई करत आहे. यात मारुंजी गट क्र. ४५/१/२ येथील परिहार यांची जी+८, भिसेन यांची जी+४, चाकले यांची जी+२ या अनधिकृत बांधकामाचे निष्कासण पूर्ण झाले आहे आणि चौधरी यांची जी+५ या अनधिकृत बांधकाम असणाऱ्या इमारती पाडण्याचे काम सुरू आहे. यासह डॉ. खेनट यांच्या जी+५ या इमारतीचे स्ट्रक्चर पाडण्याची कारवाई सुरू (२० टक्के बांधकाम तोडले) असताना मा. न्यायालयाच्या आदेशाने संबंधित कारवाई थांबवण्यात आले. उर्वरित बांधकामांबाबत पुढील आदेश प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल.