न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिंचवडगाव (दि. ०७ जुलै २०२५) :- अभियंता तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. चिंचवडगाव येथील वाल्हेकरवाडीतील गुरुद्वारा चौक परिसरात रविवारी (दि. ६ जुलै) सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. कुंदन संजय बडगुजर (वय २२, मूळ रा. अर्थे, ता. शिरपूर, जि. धुळे), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर कुंदन नोकरीच्या शोधात पिंपरी-चिंचवड शहरात आला होता. बहीण दीपाली आणि तिचा पती जयेश काशिनाथ बडगुजर (सध्या रा. गुरुद्वारा चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड, मूळगाव चोपडा, जि. जळगाव) यांच्याकडे तो काही दिवसांपूर्वी आला होता. एका खासगी कंपनीत इंटर्नशिप करत होता. त्याची बहीण दीपाली आणि दाजी जयेश हे त्यांच्या मूळगावी गेले होते. दरम्यान, कुंदन याच्याशी फोनवरून त्यांनी संपर्क साधला असता तो फोन उचलत नव्हता. त्यामुळे त्यांनी शेजाऱ्यांना याबाबत माहिती दिली. शेजाऱ्यांनी घराचा दरवाजा वाजवला मात्र, त्यानंतरही घरातून कुंदनने प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर काही नातेवाइकांनी येऊन दरवाजा तोडला असता, घरात कुंदन गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. याबाबत माहिती मिळताच चिंचवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
कुंदन याला पिंपरी येथील वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला.











