- पंडीत गागाभट्ट यांचे १४ वे वंशज द्वारिका प्रसाद भट्ट यांची प्रमुख उपस्थिती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. ०७ जुलै २०२५) :- काव्यमित्र संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व महामहिम डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिदिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार देऊन विशेष गौरव समारंभाचे आयोजन रविवारी पिंपरी चिंचवड सायन्स पार्क येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमात कलाक्षेत्रात आणि उद्योग क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणाऱ्या व्यक्तींचा राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती मातृतीर्थ सिंदखेडराजा राजे लखोजी जाधवराव यांचे १४ वे वंशज संभाजीराव राजे जाधवराव, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करणारे वैदिक पंडित गागाभट्ट यांचे १४ वे वंशज पंडित द्वारीका प्रसाद भट्ट, डिफेन्स करिअर अकॅडमीचे संचालक डॉ. केदार रहाणे, एस बी आय बँकेचे निवृत्त मॅनेजर एस व्ही सुर्यवंशी, निवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल खळदकर यांची होती.
या प्रसंगी पंडित द्वारीका प्रसाद भट्ट म्हणाले,” जहां नही पहुंचता रवि वहा पहुंचता है कवि, साहित्यकार व ज्ञानी व्यक्तींना नऊ रसाचे आकलन असल्याचे जगात सर्व पूज्य व्यक्ती हे साहित्यिक असतात. मानवी जगतात राजाला सर्वात पूज्य मानले जाते.छत्रपती शिवरायांमुळेच आज आपण अस्तित्वात आहोत. अश्या कार्यक्रमात आपल्या सारख्या सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा गौरव होणे भूषावह नक्कीच आहे.”
शिंदखेडराजा चे संभाजीराजे जाधवराव म्हणाले,” स्वामी विवेकानंद व मिसाईल मॅन स्वर्गीय डॉ. अब्दुल कलाम यांची प्रेरणा देशाला उज्वल भविष्याकडे नेत आहे.त्यांनी ज्याप्रमाणे संपूर्ण देशाला दिशा दिली त्याप्रमाणे सर्व पुरस्कार विजेत्यांनी देशाच्या प्रगतीला हातभार लावणे आवश्यक आहे.सर्वे विजेत्या पुरस्कार्थीचे अभिनंदन आणि शुभेच्छा.”
प्रमुख उपस्थिती जाधवराव व पंडित भट्ट यांचे हस्ते पाचष्ठीत पोहचलेले माजी पोलीस अधिकारी सुनिल खळदकर व सत्तरीत पोहचलेले माजी एसबीआय व्यवस्थापक एस व्ही सूर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला. त्याचप्रमाणे राष्ट्रीय कार्यगौरव पुरस्कार चारुशिला रोंदाळे, डॉ केदार रहाणे, तानाजी फणसे, सचिन पालांडे, डॉ प्रियांका शिंदे साबळे यांना प्रदान करण्यात आला.राष्ट्रीय कलागौरव पुरस्कार जेष्ठ शाहीर जयसिंगराव कांबळे, सुलेखनकार सुभाष चव्हाण व राष्ट्रीय कार्यक्षम उद्योजक पुरस्कार डॉ.विजयकुमार पाटील – रुपाली पाटील,अरुण कोल्हे,रविंद्र कुरवडे, सतिश राजपुरोहित यांना प्रदान करण्यात आला. उद्योजक डॉ.विजयकुमार पाटील यांनी राज्यात उद्योगाच्या माध्यमातून शेकडो गरजू महिलांना कसा रोजगार उपलब्ध होतो याची माहिती दिली.व महिला सक्षमीकरणाने कुटुंब कसे बलशाली बनते हे विशद केले.
कार्यक्रमात राजेश दिवटे, दत्ता उभे,प्रभू जाचक,जयवंत पवार, श्रीकांत जगताप,सतीश मोकाशी,बिभीषण पोटरे, देवेंद्र गावंडे, आय के शेख यांनी त्यांच्या कविता सादर केल्या/ कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यमित्र संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.संजय जगताप यांनी केले. मुख्य संयोजन राजेंद्र श्रीमंत सगर,सचिव हरीनाथ कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सुप्रिया मंडलिक यांनी केले. नियोजन तुकाराम गुंटे, संभाजी दंतराव, स्वप्निल सगर, साक्षी साळवे,कविता गवारी,विमलाई सगर यांनी केले.

















