न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपळे सौदागर (दि. ०९ जुलै २०२५) :- पिंपळे सौदागरच्या कुणाल आयकॉन येथील १२ व १८ मी. रस्त्याच्या काँक्रेटीकरणाचे काम प्रकल्प विभागामार्फत सुरु आहे. कामात येणाऱ्या विविध अडचणीमूळे रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा वेग मंदावला आहे. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीच्या समस्येमूळे नागरिक हैराण झाले आहेत. या कामाची पाहणी भाजप शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक शत्रुघ्न (बापु) काटे यांनी बुधवारी केली.
यावेळी प्रकल्प विभाग कार्यकारी अभियंता सुनील पवार, कनिष्ठ अभियंता केतकी कुलकर्णी, टी अँड टी इन्फ्रा लिमिटेड कॉर्डिनेटर भीमाशंकर भोसले, इन्फ्राकिंग कन्सल्टंट लीडर पतंगे आदी उपस्थित होते.
दरम्यान शत्रुघ्न काटे यांनी रस्त्याच्या कामाचा आढावा घेतला. त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डे झाले आहेत अश्या ठिकाणी पावसामुळे पाणी भरल्याने अपघाताची शक्यता लक्षात घेता तातडीने खड्डे बुजविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करा, अश्या सूचना दिल्या आहेत. रस्त्याच्या कामाचा वेग वाढवून रस्त्याचे काम पूर्ण करावे. लवकरात लवकर रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात यावा, अशा सूचना शत्रुघ्न काटे यांनी संबंधित विभाग अधिकारी यांना केल्या आहेत.
















