न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जुलै २०२५) :- शहराच्या नियोजनात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या प्रारूप विकास आराखड्यावर वाल्हेकरवाडीतील नागरिकांनी शेवटच्या दिवसापर्यंत सुमारे दोन हजार हरकती व सूचना नोंदवल्या आहेत. विकास आराखड्यात सुचविलेले १२, १५, १८ मीटर रस्ते रुंदीकरण, आरक्षित भूखंड आणि सार्वजनिक उपयोगासाठीचे जागा अधिग्रहण यासंबंधी वाल्हेकरवाडीतील रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. माजी नगरसेवकांनीही निवेदने देऊन विकास आराखड्यात फेरबदल करण्याची मागणी केली.
वाल्हेकरवाडी परिसरात अनेक ठिकाणी निवासी बांधकाम असलेल्या जागेवर रस्त्यांच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला असून अनेक वर्षे घरे बांधून राहत असलेल्या शेकडो घरांवर भीतीचे वातावरण आहे. शेकडो कुटुंबांची पिढ्यानपिढ्या येथे घरे आहेत. या घरांवर कर्ज घेतले आहे, अशा वेळी अनेक वास्तूंवर आरक्षणाचा निर्णय अन्यायकारक आहे, असे अनेक रहिवाशांनी सांगितले. अनेकांनी स्वतंत्र अर्ज भरले, तर काही हरकती सामूहिक स्वरूपात देण्यात आल्या. माजी नगरसेवकांनीही प्रशासनाकडे लेखी निवेदने देऊन विकास आराखड्यात फेरबदल करण्याची मागणी केली.
















