न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पुणे (दि. १७ जुलै २०२५) :- बुधवार पेठेत आलेल्या लोकांचा दोन जण त्यांच्या घरापर्यंत पाठलाग करायचे. घराजवळ पोहोचल्यानंतर संबंधिताला फसवून त्यांच्याकडून पैसे उकळायचे. अशाच एका घटनेत, बुधवार पेठ ते नांदेड सिटीदरम्यान त्या दोघांनी एकाचा पाठलाग केला. घराजवळ गेल्यावर त्याच्याकडे २० हजारांची मागणी केली. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. नांदेड सिटी पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली. आयुष राजू चौगुले आणि सदफ पठाण अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी चौगुले आणि पठाण बुधवार पेठेत येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांवर लक्ष ठेवून असायचे. नांदेड सिटी परिसरातील एक जण बुधवार पेठेत गेला असता त्याचा पाठलाग करत आरोपी त्याच्या घरापर्यंत आले. त्याला २० हजार रुपये ऑनलाइन देतो म्हणून रोकड घेतली. यानंतर तुमची बदनामी करू, अशी धमकी दिली.
फिर्यादीने असे काही झालेच नाही म्हणत पैसे देण्यास नकार दिला. आरोपींनी एवढ्यावरच न थांबता पोलिस हेल्पलाइन डायल ११२ या नंबरवर कॉल केला आणि पोलिसांत तक्रार द्यायला सुरुवात केली की, यांनी आमच्याकडून वीस हजार रुपये घेऊन आमची फसवणूक केली आहे. त्यानंतर नांदेड सिटी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या सगळ्या प्रकरणाची शहानिशा केली.
















