न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०१९) :- वीस दिवसांपूर्वी कासारवाडी येथे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने जलनिस्सारण नलिका टाकण्याचे काम सुरू असताना इमारतीची सुरक्षा भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका सहा वर्षीय निष्पाप बालकाला आपले प्राण गमवावे लागले होते. काम करत असताना अधिकारी आणि ठेकेदाराकडून कोणतेही सुरक्षेचे उपाय योजना करण्यात न आल्याने ही दुर्घटना घडली होती. मात्र, अद्यापपर्यंत प्रशासनाने संबंधित दोषी अधिकारी आणि ठेकेदाराविरोधात कोणतीही कारवाई केली नाही.
कासारवाडी दुर्घटनेला जबाबदार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई करून, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या मागणीसाठी युवासेनेच्या वतीने उपोषण व आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनास शिवशाही व्यापारी संघाने जाहीर पाठींबा दिला आहे.
येत्या दोन दिवसात दोषींवर कडक कारवाई करून, त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल न केल्यास शिवशाही व्यापारी संघ. पिंपरी चिंचवड यांच्या वतीने शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर होणाऱ्या परिणामांची जबाबदारी स्वतः आयुक्त साहेब आणि महापालिका प्रशासनाची असेल, असे तिरोडा-गोरेगाव शिवसेना विधानसभा संपर्कप्रमुख व शिवशाही व्यापारी संघ प्रदेश अध्यक्ष युवराज दाखले यांनी आयुक्त हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.


















