न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ मे २०१९) :- भोसरीतील भोर रबर इंडस्ट्रीज येथे पिंपरी चिंचवड शहर विकास आघाडीचे अध्यक्ष अभय भोर यांच्या मार्गदर्शनाखाली झोपडपट्टीतील युवक व बेरोजगार तरुणांची बैठक संपन्न झाली. या बैठकीला बालाजीनगर, फुलेनगर परिसरातील बेरोजगार तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बेरोजगार युवकांनी आपल्या व्यथा मांडल्या.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना भोर म्हणाले की, ”औद्योगिक परिसरामध्ये मोठय़ा प्रमाणात इंडस्ट्रीज आहेत. इंडस्ट्रीजची बांधकामे व इतर मोठ्या स्वरूपाची कामे झोपडपट्टी परिसरातील तरुणांकडून करून घेतली जातात. परंतु, कंपन्यांमध्ये परिसरातील युवकांना कामाला ठेवण्यासाठी नकारात्मक प्रतिसाद कायम असतो. परिसरात बाहेरील राज्यातील तरुणांना नोकरी दिली जाते व स्थानिक तरुणांना नाकारले जाते. उद्योजकांनी ही मानसिकता बदलायला हवी. कारण परिसरात राहणारे सर्वच तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीचे नसतात. यामध्ये अनेक तरून उच्चशिक्षित व विविध कला संपन्न असणारे तरुण आहेत. जर या तरुणांना आपण चालना दिली तर, मोठ्या प्रमाणात परिसरात बदल घडू शकतो व नवीन तरुणांना संधी दिल्यास त्याचा फायदा परिसरातील उदयोजकांनाही होईल. यात अनेक तरून औद्योगिक परिसराच्या सुरक्षेसाठीही पुढे येण्यास तयार झालेले आहेत. हा या तरुणांचा मोठेपणा मानता येईल. त्याला सर्व उद्योग क्षेत्रातील उद्योजकांनी साथ दिल्यास नवीन संकल्पना निर्माण होण्यास वेळ लागणार नाही व चित्र बदललेले दिसेल.
लवकरच परिसरातील तरुणांचे वेगवेगळे ग्रुप तयार करून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातील व समाजात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला जाईल. त्यासाठी अनेक उद्योजकसुद्धा पुढे येण्यास तयार आहेत. कंपन्यांच्या सीएसआर निधीमार्फत या तरुणांसाठी नवीन संकल्पना निर्माण करून, त्यांना चालना देण्यास सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे भोर म्हणाले.
सरकारच्या अनेक योजना आहेत. त्या योजनांमार्फत या तरुण पिढीला उद्योग व्यवसायात आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा ही तरुण पिढी गैरमार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी शहरातील प्रत्येकाचे नैतिक कर्तव्य आहे. येणाऱ्या पिढीला घडविण्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन यामध्ये सहभाग नोंदवावा, असेही भोर यावेळी म्हणाले.











