न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ जुलै २०२५) :- महाळुंगे एमआयडीसी परिसरातील कुरुळी गावाच्या हद्दीत स्पायसर चौक रोडवर २४ जुलै २०२५ रोजी पहाटे भीषण अपघात घडला. भरधाव इनोव्हा गाडीने दिलेल्या जोरदार धडकेत रिक्षाचालक दत्तात्रय पांडुरंग मुंगसे (वय ४९, रा. रासे, ता. खेड) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी नरेश सदानंद ढोले (वय ४२, रा. ढोले वस्ती, कुरुळी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नरेश ढोले याने एम.एच.१४ जे.पी.३५३५ या क्रमांकाची इनोव्हा क्रिस्टा गाडी भरधाव व हयगयीने चालवली. यामुळे फिर्यादी काळुराम मुंगसे यांचे बंधू दत्तात्रय यांच्या रिक्षाला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे रिक्षा समोर उभ्या असलेल्या टाटा कंपनीच्या टेम्पोवर आदळली आणि अपघातात गंभीर जखमी झालेल्या दत्तात्रय यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी भा.न्या.संहिता व मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांनुसार महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक महाडीक अधिक तपास करीत आहेत.












