- दिघी पोलिसांकडे गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जुलै २०२५) :- अल्ट्राटेक सिमेंटची एजन्सी देतो असे सांगून एका बांधकाम व्यावसायिकाची तब्बल १ लाख ३८ हजार ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम व भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी प्रशांत प्रकाश डोंगरे (वय ३२, रा. च-होली बु., हवेली) यांना १९ जून ते २५ जुलै दरम्यान अनोळखी क्रमांकांवरून कॉल आले. कॉल करणाऱ्याने स्वत:ला वैभव त्रिवेदी म्हणून सांगत, अल्ट्राटेक सिमेंटची एजन्सी मिळवून देण्याचे आमिष दाखवले. रजिस्ट्रेशन व डिपॉझिटच्या नावाखाली फिर्यादीकडून बॅक खात्यावर एकूण १,३८,५०० रुपये वर्ग करण्यात आले.
पैसे पाठवल्यानंतर संबंधित व्यक्तीने कॉल घेणे बंद केले.
संशय आल्यावर फिर्यादीने अल्ट्राटेकच्या मुंबई ऑफिसमध्ये संपर्क साधला असता फसवणुकीची बाब उघडकीस आली. या प्रकरणी दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा (क्र. ३३७/२०२५) दाखल करण्यात आला असून, वपोनि बापू ढेरे तपास करत आहेत. आरोपी अद्याप अज्ञात असून तपास सुरू आहे.










