- ट्रकच्या धडकेत युवतीचा मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
दापोडी (दि. २६ जुलै २०२५) :- जुना मुंबई-पुणे महामार्गावरील दापोडी मेट्रो स्थानकाजवळ एका टाटा कंपनीच्या ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ५५ वर्षीय माजी सैनिकाची मुलगी जागीच ठार झाली. ही दुर्दैवी घटना २५ जुलै २०२५ रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास घडली.
फिर्यादी अशोक महादु थोरात (रा. लोहगाव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची मुलगी अपेक्षा ही मोटरसायकलवरून जात असताना ट्रक (क्र. एमएच-१२ एलटी-४५३७) ने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ती रस्त्यावर पडली आणि ट्रकचे पुढील चाक तिच्यावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच तीचा मृत्यू झाला.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम १०६, १२५(अ), १२५(ब), २८१ तसेच मोटार वाहन कायदा कलम ११९, १८४/१७७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक पवळे पुढील तपास करत आहेत. ट्रक चालकाविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.










