न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२५) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने मोशी येथे ७०० खाटांचे भव्य रुग्णालय उभारले जात असून, हा ३४० कोटींचा प्रकल्प डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झाला आहे. १५ एकर जागेवर आणि ५७,४५० चौ.मी. बांधकाम क्षेत्रात हे रुग्णालय तळमजला + ८ मजली इमारतीसह उभारले जात आहे. सद्यस्थितीत तिसऱ्या मजल्यापर्यंतचे बांधकाम पूर्ण झाले असून, प्रकल्प ३६ महिन्यांच्या वेळापत्रकानुसार प्रगतीपथावर आहे.
या रुग्णालयात ओपीडी, रेडिओलॉजी, डायग्नोस्टिक, बालरोग, स्त्रीरोग, मानसिक आरोग्य, डे केअर, आयसीयू, डायालिसिस, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर व वॉर्ड्स यांसारख्या अत्याधुनिक सुविधा असतील. कर्मचाऱ्यांसाठी निवास, डॉरमिटरी व लेक्चर हॉलसह निवासी इमारतींचे नियोजन करण्यात आले आहे.
रुग्णालयात २७४ चारचाकी व २५० दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था असून, हरित व ऊर्जा कार्यक्षम रचना या प्रकल्पाचे वैशिष्ट्य आहे. यामध्ये EDGE व IGBC Gold मानांकनासाठी पात्रता, २०० केएलडी सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प, रूफटॉप सोलर पॅनल्स, पावसाचे पाणी संकलन, पीएसए ऑक्सिजन जनरेटर व अग्निसुरक्षा उपायांचा समावेश आहे.
भविष्यात येथे २०० खाटांचे कर्करोग रुग्णालय व १५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेले वैद्यकीय महाविद्यालयही उभारले जाणार आहे. या प्रकल्पामुळे शहरातील वाढत्या लोकसंख्येला दर्जेदार आरोग्यसेवा आणि वैद्यकीय शिक्षणाची सुविधा मिळणार आहे, असा विश्वास महापालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.











