- माजी खासदार समीर भुजबळ यांचा पिंपरीत निर्धार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जुलै २०२५) :- अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्याध्यक्ष तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी पिंपरीत आढावा बैठक संपन्न झाली.
या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणना आणि आगामी निवडणुकीसंदर्भात त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. या प्रसंगी समता परिषदेचे शहराध्यक्ष प्रदीप आहेर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
समीर भुजबळ म्हणाले की, “केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला असून ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. त्यासंदर्भात आम्ही घरोघरी जनजागृती मोहीम राबवणार आहोत. ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी आमचा लढा थांबणार नाही. ओबीसी आरक्षणाला कोणताही धक्का लागू दिला जाणार नाही.”
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “मराठा समाजाने ओबीसींच्या वाटेत येऊ नये. आरक्षणाचा लाभ फक्त ओरिजनल कुणबी समाजालाच मिळातो. आम्ही सरसकट मराठा आरक्षणास विरोध करत आहोत. यामुळे ओबीसींच्या अधिकारांवर गदा येणार नाही याची खात्री आम्ही करू.”
निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाबाबत ते म्हणाले, “भाटिया आयोगाच्या अहवालामुळे ओबीसींच्या सुमारे 32 टक्के जागा कमी झाल्या होत्या. आम्ही याविरोधात न्यायालयात गेलो. आता 2011 च्या जनगणनेनुसारच आगामी निवडणुका होणार आहेत. जातनिहाय जनगणनेनंतर खरी आकडेवारी समोर येईल आणि त्यावर आधारित नवे आरक्षण धोरण मांडले जाईल.”
भुजबळ यांनी सांगितले की, समता परिषदेच्या माध्यमातून सामाजिक समतेसाठी त्यांनी सुरू केलेली चळवळ अधिक व्यापक केली जाणार आहे. ओबीसींना न्याय मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न अधिक तीव्र होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.











