न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिकेतील अधिकारी व कर्मचा-यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते. अशा तब्बल १६ निलंबित अधिकारी व कर्मचा-यांना पालिका प्रशासनाने पुन्हा कामावर रुजू करून घेतले आहे. पालिकेच्या या कारभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
यात १२ लाख रुपयांची लाच घेताना स्वीय सहायक व लघुलेखक राजेंद्र शिर्के, पालिकेच्या क्रीडा प्रबोधिनी विद्यालयातील ठेक्यावरून ठेकेदाराकडून लाच घेताना प्रभारी शिक्षणाधिकारी व मुख्याध्यापिका अलका कांबळे व मुख्याध्यापक बाबासाहेब राठोड, सहायक आरोग्याधिकारी तानाजी दाते, लेखाधिकारी किशोर शिंगे, लिपिक प्रकाश रोहकले, लिपिक अमोल वाघेरे, अग्निशामक दलाचे सबऑफिसर उदय वानखेडे व फायरमन अनिल माने, क्रीडा शिक्षक रवींद्र कांबळे, मजूर राजेश राजपूत, सर्वेअर सुभाष खरात, मजूर नीलेश राठोड, मीटर निरीक्षक शीतल चतुर्वेदी, वॉर्ड बॉय शैलेश जाधव यांना वेगवेगळ्या घटनेत लाच घेताना पकडण्यात आले होते.
या कर्मचा-यांना पुन्हा सेवेत रुजू करून, घेण्याचे आदेश पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत. दरम्यान, या सर्व १६ लाचखोर अधिकारी व कर्मचा-यांना आर्थिक स्वरूपाच्या कामकामाशी थेट संबंध येणार नाही, अशी दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधित विभागप्रमुखांना दिले आहेत.











