न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ मे २०१९) :- शहरातील गुन्हेगारी मुळासकट उपसून फेकण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयामध्ये गुन्हे शाखेचे आणखी तीन युनिट वाढविण्यात येणार आहेत. तसेच एक सहायक आयुक्त विभागदेखील नव्याने सुरू करण्यात येणार आहे. पोलिस आयुक्त आर. के. पज्ञनाभन यांनी सोमवारी (दि. २७) रोजी हा निर्णय घेतला.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाची स्थापना झाल्यानंतर आयुक्त पद्मनाभन यांनी सुरुवातीला गुन्हे शाखा युनिट एक आणि दोन कार्यान्वित केले. गुन्हे शाखा युनिट एकचा मोहननगर येथे तर, युनिट दोनचा कारभार डांगे चौक येथे सुरू आहे. या व्यतिरिक्त खंडणी, दरोडाविरोधी, अमली पदार्थ विरोधी आणि आर्थिक गुन्हे शाखादेखील सुरू आहेत.
पंधरा पोलिस ठाण्यांच्या विभागणीनुसार वाकड, देहुरोड, चाकण आणि पिंपरी असे चार सहायक आयुक्त विभाग यापूर्वी सुरू होते. आता यामध्येदेखील आणखी एक विभाग वाढविण्यात येणार आहे. गुन्हे शाखेचे एकूण पाच युनिट आणि पाच सहायक आयुक्त विभाग अशी नवी रचना असणार आहे. तसेच शहरातील गुन्हेगारांच्या हालचालींवर सूक्ष्म नजर ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे युनिट वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबरोबरच अँटी गुंडा स्कॉडही अॅक्टिव्ह करण्यात आले आहे. या स्कॉडमध्ये एकूण आठ कर्मचारी आणि एका अधिका-याची नियुक्ती करण्यात आली आहे.











